पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) शिक्षण विभागाकडून वारंवार पत्रव्यवहार करत लेखी, तोंडी सांगून देखील खासगी शाळेतील पटावर असलेल्या विद्यार्थ्यांचे युडायस व सरल प्रणालीमध्ये आधार वैधता न केल्याने शहरातील नऊ खासगी शाळांना ‘कारणे दाखवा’ नोटीस दिली आहे. तसेच या शाळांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यासाठी २९ एप्रिल रोजी सुनावणी प्रस्तावित केली आहे, अशी माहिती प्रशासन अधिकारी संगिता बांगर यांनी दिली.
खालील शाळांना पाठवली ‘कारणे दाखवा’ नोटीस…
महापालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे युडायस व सरल प्रणालीमध्ये आधार वैधता न केल्याने शिस्तभंगाची कारवाई का करू नये अशी विचारणा करत नोटीस बजावली आहे. यामध्ये एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल-चिंचवड, ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल- ताथवडे, अल्नूर इंग्लिश मिडीयम स्कूल, युरो स्कूल वाकड, अक्षरा इंटरनॅशनल स्कूल-पुनावळे, राॅजर्स इंग्लिश स्कूल-काळेवाडी, साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल- पिंपरी, आल्फोन्सो हायस्कूल काळेवाडी, नाॅव्हेल इंटरनॅशनल- संभाजीनगर या नऊ शाळांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबवण्यासाठी युडायस प्रणालीमधील माहिती आधारभूत मानण्यात येते. विद्यार्थी आधार वैधतेबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून वारंवार विचारणा होत आहे. याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे मुख्य सचिव यांनी २२ एप्रिल २०२४ रोजी घेतलेल्या आढावा बैठकीत आधार वैधता न भरल्याने शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी शाळांचा युडायस व सरल प्रणाली मधील विद्यार्थी आधार वैधता याविषयी आढावा घेण्यात आला. यामध्ये शहरातील नऊ खासगी शाळांनी युडायस प्रणालीत नोंद केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सोबत दिलेल्या यादीनूसार विद्यार्थी आधार वैध करण्याचे काम प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे.
त्यानूसार खासगी शाळेतील पटावर नोंद असलेल्या १०० टक्के विद्यार्थ्यांचे युडायस व सरल प्रणालीत आधार वैद्यता करण्याविषयी संपुर्ण वर्षभर वारंवार सूचना देऊन, याविषयी पाठपुरावा करुनही अद्याप आधार वैधता पुर्ण केलेली नाही. आधार वैधता करण्याकडे शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. त्यामुळे ही अतिशय गंभीर स्वरुपाची बाब आहे. शहरातील नऊ खासगी शाळांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. त्या शाळेच्या पटावर असलेल्या शंभर टक्के विद्यार्थ्यांचे युडायस व सरल प्रणालीमध्ये आधार वैद्यता न केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येत असून त्या शाळांची सुनावणी देखील ठेवण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांनी सदर सुनावणीसाठी समक्ष महापालिकेच्या शिक्षण विभागात सोमवारी (२९ एप्रिल) सकाळी ११ वाजता उपस्थित राहावे, तसेच सुनावणीला येताना शाळेचे शासन मान्यता पत्र, उपसंचालक मान्यता पत्र, प्रथम मान्यता पत्र, स्व मान्यता घेऊन येणे आवश्यक असणार आहे. या सुनावणीला समक्ष उपस्थित न राहिल्यास अथवा प्राप्त खुलासा असमाधानकारक वाटल्यास कोणतीही पुर्वसूचना न देता आपल्याविरुद्ध योग्य ती शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. याशिवाय शाळा मान्यता काढण्याची शिफारस शिक्षण उपसंचालक, पुणे यांच्या विभागाकडे करण्यात येईल, यांची गांभिर्याने नोंद घ्यावी, असेही शिक्षण विभागाने बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.