Monday, July 20, 2026
Homeताजी बातमी८८५ कोटी रुपयांच्या उपसुचनेसह अर्थसंकल्प मंजूरीसाठी सर्वसाधारण सभेकडे - ॲड. नितीन लांडगे

८८५ कोटी रुपयांच्या उपसुचनेसह अर्थसंकल्प मंजूरीसाठी सर्वसाधारण सभेकडे – ॲड. नितीन लांडगे

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा २०२२ – २३ चा अर्थसंकल्प शुक्रवारी १८ फेब्रुवारी रोजी प्रशासनाने स्थायी समितीकडे सादर केला होता. हा अर्थसंकल्प वाढ घटीच्या ८८५ कोटी ६६ लाख रुपयांच्या उपसुचनांव्दारे सर्वसाधारण सभेकडे मंजूरीसाठी बुधवारी (दि. २३ फेब्रवारी) पाठवण्यात आला आहे अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

या अर्थसंकल्पात वाढघटीच्या उपसुचनांव्दारे पुढील प्रमाणे शिफारस करण्यात आली आहे. सन २०२१-२२ च्या सुधारीत अंदाजपत्रकात २४७ कामांसाठी १०६ कोटी २९ लाखांहून जास्त विकास कामांची शिफारस आणि सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात २७५ विकास कामांसाठी ८८५ कोटी ६६ लाख रुपयांहून जास्त शिफारस करण्यात आली आहे. तसेच नविन ६७ विकास कामांसाठी ६६ कोटी, ८७ लाख रुपयांहून जास्त शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात आवश्यक त्या कामांसाठी दरवर्षी प्रत्येकी २५ लाख रुपयांची तरतूद करावी अशीही शिफारस सर्वसाधारण सभेकडे करण्यात आली आहे.

बुधवारी (दि. २३ फेब्रुवारी) स्थायी समितीची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ॲड. नितीन लांडगे होते. पर्यावरणाचा समतोल राखला जावा आणि शहरातील प्रदूषण कमी व्हावे यासाठी पदाधिकारी व अधिका-यांसाठी ‘ई – वाहन’ खरेदी करावेत ; पद्मभूषण माजी खासदार राहुल बजाज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आकुर्डीमध्ये स्मारक उभारणे ; शहरातील सर्व बीआरटी मार्गांवरील बसथांब्यांवर स्त्री आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह उभारणे ; इंदोर पॅटर्न प्रमाणे शहरातील कचरा संकलन आणि प्रक्रिया करण्यास चालना देणे ; ‘स्वच्छाग्रह’ ब्रॅण्डव्दारे शहरभर स्वच्छता कायम राखली जाईल यासाठी नियोजन करणे ; भोसरीतील सहल केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय ; कै. अंकुशराव लांडगे सभागृह मागील जागेत एसटीपी प्रकल्प ; उर्वरीत मोकळ्या जागेत महावितरण कंपनीसाठी स्विचिंग स्टेशन उभे करण्यास जागा देणे ; भोसरीतील नविन रुग्णालय पुर्ण क्षमतेने चालवून नागरिकांना चोविस तास अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुविधा देणे ; वाढत्या शहरीकरणामुळे शहरात विविध माध्यम प्रतिनिधींची संख्या देखिल वाढली आहे. या प्रतिनिधींसाठी पुणे – मुंबई महामार्गावर वल्लभनगर येथे सुसज्ज पत्रकार भवन उभारावे अशीही शिफारस सर्वसाधारण सभेकडे करण्यात आली आहे.

या अर्थसंकल्पामुळे पुढील काळात पिंपरी चिंचवड शहराचा स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक होईल. हा अर्थसंकल्प सर्व समावेशक आहे असेही स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments