Monday, July 14, 2025
Homeगुन्हेगारी६ वर्षीय चिमुकलीचा शाळेत विजेच्या धक्क्याने मृत्यू ; मुख्याध्यापक निलंबित

६ वर्षीय चिमुकलीचा शाळेत विजेच्या धक्क्याने मृत्यू ; मुख्याध्यापक निलंबित

इयत्ता पहिल्या वर्गात मोठ्या उत्साहाने तिने पाऊल ठेवले; पण सत्राच्या तिसऱ्या दिवशीच शाळेच्या गलथानपणामुळे तिचा जीव गेला. स्वच्छतागृहात पडून असलेल्या ॲल्युमिनियम क्वॉईल्ड वायरच्या स्पर्शामुळे विजेचा धक्का बसून तिचा मृत्यू झाला.

यशस्वी सोपान राऊत (६ वर्षे), असे या विद्यार्थिनीचे नाव असून, ही घटना बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पुयार जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत घडली. अन्य विद्यार्थिनी स्वच्छतागृहात गेल्या असता त्यांना यशस्वी पडलेल्या अवस्थेत आढळली. त्यांनी घटनेची माहिती शिक्षकांना दिली. तिला तातडीने लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

मुख्याध्यापक निलंबित

दुर्घटनेला जबाबदार ठरवून प्रभारी मुख्याध्यापक नीलकंठ भावे यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

शाळा पुरस्कारप्राप्त

संबंधित जिल्हा परिषद शाळा पुरस्कार प्राप्त होती. गेल्या सत्रामध्ये ‘मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा’ स्पर्धेमध्ये शाळेने तालुक्यातून पहिला पुरस्कारही मिळविला होता.

निव्वळ गलथानपणाच !

जिवंत वीजप्रवाह असलेला वायर स्वच्छतागृहात पडून असल्यानेच ही दुर्घटना घडली, त्यामुळे शाळेचा गलथानपणाच समोर आला आहे. ॲल्युमिनियम क्वॉईल्ड वायर बेवारसपणे स्वच्छतागृहातच कशी?, त्यात विजेचा प्रवाह कसा आला? वायर कधीपासून होती? जयाकडे कुणाचे लक्ष का गेले नाही? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे समोर येतात. सॅनिटरी पॅड मशीनसाठी लावलेला विजेचा बोर्डही उघड्यावर असल्याने पावसात धोका होऊ शकतो, हे कुणाच्या लक्षात का आले नाही?

गावकऱ्यांचा ठिय्या

यशस्वीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविल्यावर गावकऱ्यांनी रुग्णालयासमोरच ठिय्या आंदोलन केले. जबाबदार असलेल्यांना निलंबित करा आणि आर्थिक नुकसानभरपाई करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, गावकऱ्यांची गर्दी आणि आक्रोश पाहता गावात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनीही शाळेत धाव घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments