टेलिकॉम क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. आजपासून देशात 5जी मोबाईल सेवा सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता 5 जी सेवेचं उद्घाटन होईल. पहिल्या टप्प्यामध्ये भारतातील एकूण 13 शहरांमध्ये ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर हळूहळू संपूर्ण देशात 5G सेवा सुरु केली जाईल.
सुरुवातीला एअरटेल आणि जिओ यांच्यामार्फक 5G सेवा ग्राहकांना पुरवली जाणार आहे. 5G सेवेच्या लोकर्पण सोहळ्याला मुकेश अंबानी, सुनील भारती मित्तल आणि कुमार मंगलम बिर्ला हे उद्योग क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात दोन प्रमुख शहरांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात 5G सेवा सुरु केली जाईल. त्यात मुंबई आणि पुणे या दोन शहरांचा समावेश आहे. यासोबत दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, बंगळुरु, चंदीगड, गांधीनगर, हैदराबाद, जामनगर, लखनौ या शहरांमध्येही 5G सेवा सुरु केली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातील 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
सुरुवातीला 5G साठी 4G इतकीच किंमत मोजवा लागण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर टेलिकॉम कंपन्या 5Gच्या किंमतीत वाढ करतील, असा अंदाज बांधला जातोय. अद्याप कोणत्याही कंपनीने 5G सेवेसाठीचे दर जारी केलेले नाहीत. त्यामुळे 5G सेवेसाठी नेमके किती रुपये मोजावे लागतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
5G सेवा आज जरी लॉन्च केली जाणार असली, तरी प्रत्यक्षात ग्राहकांना मात्र या सेवेसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. एअरटेल आणि जिओ यांच्याकडून 5G सेवेला सुरुवात केली जाईल.