१ एप्रिल २०२१,
दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना ५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी ही घोषणा केली. यावेळी करोना संसर्गामुळे सर्व पुरस्कारांची घोषणा उशिरा करण्यात आली. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणाही करण्यात आली होती. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो.
सिनेसृष्टीत महत्वाची कामगिरी करणाऱ्या अभिनेत्याला दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जात. यंदाचा हा पुरस्कार सुपरस्टार रजनीकांत यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. त्याचसोबत त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. ” भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेता रजनीकांतजी यांना 2019 सालातील दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करताना आंनद होत आहे. त्यांचं अभिनेता, निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून असलेलं योगदान महत्वाचं आहे. ” असं ट्वीट करत प्रकाश जावडेकर यांनी ज्यूरी सदस्यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, रजनीकांत हे १२ वे दाक्षिणात्य कलाकार आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी डॉ.राजकुमार, अक्किनेनी नागेश्वरा राव, के. बालाचंदर या ज्येष्ठ कलाकारांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. ही बातमी समोर आल्यापासून रजनीकांत यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.
रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बेंगलुळूमधील एका मराठी कुटुंबात झाला होता. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांनी कठोर परिश्रम आणि संघर्षानंतर टॉलीवूडमध्ये विशेष स्थान मिळवलं. आपल्या खास स्टाइल आणि अंदाजामुळे त्यांनी बॉलीवूडमध्येही स्वतःचं वेगळ स्थान निर्माण केलं. दक्षिण भारतात चाहते रजनीकांत यांना देवाच्या स्थानी मानतात.