Wednesday, June 18, 2025
Homeताजी बातमी५० वर्षे जुनी परंपरा बदलणार..! अमर जवान ज्योत प्रजासत्ताक दिनापूर्वी येथून हलवली...

५० वर्षे जुनी परंपरा बदलणार..! अमर जवान ज्योत प्रजासत्ताक दिनापूर्वी येथून हलवली जाणार..

राजधानी दिल्लीतील इंडिया गेटची ५० वर्षांपासून ओळख बनलेली अमर जवान ज्योत प्रजासत्ताक दिनापूर्वी येथून हलवली जात आहे. आता ही ज्योत इंडिया गेट ऐवजी राष्ट्रीय युद्ध स्मारक (नॅशनल वॉर मेमोरियल) येथे विलीन होऊन ती प्रज्वलित करण्यात येणार आहे. ही ज्योत आज दुपारी ३.३० वाजता युद्ध स्मारकाच्या ज्योतीत विलीन होणार आहे.

अमर जवान ज्योतीची मशाल आज दुपारी राष्ट्रीय युद्ध स्मारकात आणली जाईल. तेथे एका समारंभात दोन्ही ज्योत विलीन होतील. एअर मार्शल बलभद्र राधाकृष्ण समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिली.

१९७१ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात शहीद झालेल्या ३,८४३ भारतीय जवानांच्या स्मरणार्थ ही इंडिया गेट बांधले गेले. तिथे प्रथम १९७२ मध्ये ज्योत प्रकाशित झाली होती. यानंतर २६ फेब्रुवारी १९७२ ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी ज्योतीचे उद्घाटन केले होते. केंद्र सरकारने २०१९ मध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधले होते. १९४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर हौतात्म्य पत्करलेल्या २६,४६६ भारतीय जवानांच्या सन्मानार्थ हे स्मारक उभारण्यात आले आहे. २५ फेब्रुवारी २०१९ ला पंतप्रधान मोदींच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.

राहुल गांधी म्हणाले…
अमर जवान ज्योत हलवण्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काही लोक देशप्रेम आणि हौतात्म्य समजत नाही, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. अतिशय खेदाची बाब आहे. शूर जवानांसाठी जी अमर जवान ज्योत पेटत होती, ती आता विझणार आहे. काही लोक देशप्रेम आणि हौताम्य समजत नाही. काही हरकत नाही. आम्ही आमच्या जवानांसाठी अमर जवान ज्योती पुन्हा प्रज्वलित करू, असे राहुल गांधी म्हणाले.

अमर जवान ज्योत इंडिया गेटवरून राष्ट्रीय युद्ध स्मारकापर्यंत हलवण्याच्या सरकारच्या निर्णयावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक माजी सैनिकांनीही आपल्या भावना जुळल्या असल्याचे सांगत तिथून ज्योत हटवू नये, असे आवाहन केले आहे. डिसेंबर २०२१ ला १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाली.

इंडिया गेट हजारो जवानांचे स्मृतीचिन्ह

राजधानी दिल्ली ४२ मीटर उंच इंडिया गेट ब्रिटिश सरकारने बांधले होते. १९१४-२१ मधील पहिल्या महायुद्धात आणि तिसर्‍या अफगाण युद्धात ब्रिटीश सैन्याच्या वतीने शहीद झालेल्या ८४,००० भारतीय जवानांच्या स्मरणार्थ ब्रिटीश सरकारने हे स्मारक बांधले आहे. त्यावर त्या सैनिकांची नावेही कोरलेली आहेत.

‘अमर जवान ज्योत विझलेली नाही, ती हलवण्यात येतेय’

आजच्या कार्यक्रमाबाबत अनेक गैरसमज आहेत. अमर जवान ज्योत विझली जाणार नाही. ती राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे प्रज्वलित केलेल्या ज्योतीमध्ये विलीन केली जात आहे. १९७१ आणि इतर युद्धात शहीद झालेल्या जवानांना अमर जवान ज्योत येथे श्रद्धांजली वाहण्यात येत होती. पण यापैकी कोणाचेही नाव येथे दिलेले नाही, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

इंडिया गेटवर लिहिलेली नावे पहिला महायुद्धातील आणि अँग्लो-अफगाण युद्धात शहीद झालेल्या सैनिकांची आहेत. ते आपल्या गुलामगिरीच्या काळाची आठवण करून देते. १९७१ च्या युद्धासह इतर सर्व युद्धांमध्ये शहीद झालेल्या सैनिकांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकात नोंदवली जातात. त्यामुळे तिथे ज्योत प्रज्वलित करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. ज्यांनी ७० वर्षात राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधले नाही ते आता आपल्या शहीद जवानांना योग्य ती श्रद्धांजली देण्यावरून वाद निर्माण करत आहेत, अशी टीका सरकारमधील सूत्रांनी विरोधकांवर केली आहे.

मात्र, ही ज्योत युद्ध स्मारकावर नेण्याचे समर्थक सांगतात की, जवानांच्या स्मरणार्थ आधीच तिथे ज्योत आहे. ती जागा फक्त हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उभारण्यात आली आहे. अमर जवान ज्योती तात्पुरत्या स्वरूपात इंडिया गेटवर बसवण्यात आली होती. आता आमचे स्वतःचे युद्धस्मारक आहे, ते तिथे नेणे योग्य ठरेल, असे माजी नौदल प्रमुख अॅडमिरल अरुण प्रकाश यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments