Thursday, May 23, 2024
Homeताजी बातमीचिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 50.47% मतदान… अखेरच्या टप्प्यातल्या मतदानानंतर उमेदवारांची धाकधूक वाढली

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 50.47% मतदान… अखेरच्या टप्प्यातल्या मतदानानंतर उमेदवारांची धाकधूक वाढली

चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी शांततेत, सुरळीत आणि उत्साहाच्या वातावरणात मतदान पार पडले. नवोदित मतदारांसह युवक, युवती, पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच इतर मतदारांनी आज आपला मताधिकार बजावला असुन या पोटनिवडणुकीसाठी ५०.४७ टक्के इतके सरासरी मतदान झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

मतदान प्रक्रियेला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली होती. सकाळी नऊ वाजेपर्यंत ३.२५ टक्के मतदान झाले. तर सकाळी ११ वाजेपर्यंत झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी १०.४५ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत २०.६८ टक्के, दुपारी ३ वाजेपर्यंत ३०.५५ टक्के एवढी आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४१.०६ टक्के इतकी होती. एकूण झालेल्या अंतिम मतदानाची सरासरी टक्केवारी ५०.४७ टक्के इतकी झाली.

एकुणच संपूर्ण मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. चिंचवड विधानसभा या मतदार संघामध्ये एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार होते. एकूण ५१० मतदार केंद्रावर मतदान संपन्न झाले. यापैकी मतदारसंघातील २५५ मतदान केंद्रावर वेबकास्टींगच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात आले होते. निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी थेरगाव येथील शंकरआण्णा गावडे कामगार भवनमध्ये नियंत्रण कक्ष उभारण्यात आला होता. या कक्षातून संपूर्ण मतदान प्रक्रियेवर तसेच यंत्रणेवर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले लक्ष ठेवून होते. या कक्षामध्ये सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, शितल वाकडे, निवडणूक सहायक अधिकारी नागेश गायकवाड, माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी किरण गायकवाड, निवडणूक सहायक अधिकारी प्रशांत शिंपी, थॉमस नरोन्हा, ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन कक्षाचे समन्वयक बापू गायकवाड, पोस्टल मतदान कक्षाचे समन्वयक राजेश आगळे, समन्वयक सिताराम बहुरे, बेल इलेक्ट्रॉनीक्सचे तज्ज्ञ अधिकारी, डॅशबोर्ड कक्ष समन्वयक अनिता कोटलवार, विजय बोरुडे, नायब तहसीलदार श्वेता आल्हाट, संतोष सोनवणे यांच्यासह निवडणूक विभागाचे अधिकारी कर्मचारी, संगणक चालक कार्यरत होते. मतदान केंद्रावर दिव्यांगांना सहाय्य करण्यासाठी दिव्यांग कक्षाचे समन्वय अधिकारी श्रीनिवास दांगट यांनी कामकाज पाहिले.

कोणत्याही मतदार केंद्रावर उद्भवलेल्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच मदतीसाठी शीघ्र कृती दलाचे ( क्विक रिस्पॉन्स टीम ) ७ पथक कार्यरत होते. ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण उद्भवल्यास शीघ्र कृती दल तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन निर्माण झालेली तांत्रिक अडचण दूर करत होते. त्यामुळे मतदान प्रक्रियेला कुठेही बाधा आली नाही. या पथकात निवडणूक विभागाचे कर्मचारी, अधिकारी, बीएलओ तसेच बेल इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे अभियंते यांचा सहभाग होता. तर सेक्टर अधिकाऱ्यांकडे मतदान केंद्रनिहाय जबाबदारी सोपवण्यात आली होती. प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यासाठी ३७०७ पोलीस कर्मचारी व ७२५ अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान, निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांनी थेरगाव येथील नियंत्रण कक्ष तसेच यशवंतराव चव्हाण माध्यमिक शाळेमधील सखी मतदान केंद्र, रावेत येथील भोंडवे शाळेतील आदर्श मतदान केंद्र तसेच इतरही मतदार केंद्रांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. आदर्श मतदान केंद्रावर दिव्यांग सहायता कक्ष तसेच महिलांसाठी हिरकणी कक्षाची निर्मिती करण्यात आली होती. सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग सहाय्यक कक्ष उभारण्यात आला होता. या ठिकाणी दिव्यांगांसाठी तसेच वयोवृद्ध मतदारांसाठी विशेष सहाय्यकासह व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच काही मतदान केंद्रावर मतदारांसाठी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. मताधिकार बजावल्यानंतर सेल्फी काढण्याचा आनंद मतदारांनी घेतला. अंध, मूकबधीर मतदारांनी देखील आपला मतदानाचा अधिकार बजावला. ब्रेल लिपीत उपलब्ध करून दिलेल्या मतपत्रिकेमुळे अंध मतदारांना मतदानाचा अधिकार बजावण्यास मदत झाली. निवडणूक आयोगाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे आम्हाला लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये ख-या अर्थाने सहभागी होता आले. त्यामुळे स्वावलंबीपणे मतदान करता आले, अशी भावना यावेळी या मतदारांनी व्यक्त केली. सर्व मतदान केंद्रावर मूकबधीर मतदारांना सहाय्य करण्यासाठी वाचा उच्चार तज्ज्ञ देखील नियुक्त करण्यात आले होते.

मतदान प्रक्रिया संपल्यानंतर थेरगाव येथील शंकरआण्णा गावडे कामगार भवन येथे मतदान साहित्य जमा करण्याची कार्यवाही सुरु होती. साहित्य स्वीकृतीसाठी नेमणूक करण्यात आलेल्या १४८ कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली होती. याठिकाणी ३४ टेबलद्वारे मतदान केंद्रनिहाय साहित्य स्विकृती कामकाजाला सुरुवात करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत हे कामकाज सुरू होते. नेमून दिलेल्या मतदान केंद्राचे साहित्य मतदान केंद्राध्यक्ष व संबंधित मतदान अधिकारी यांच्याकडून मतदान केंद्रनिहाय ईव्हीएम म्हणजेच बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र, इतर साहित्य तसेच मतदान प्रक्रीयेविषयीचे विविध सीलबंद पाकीटे आणि लिफाफे आदी साहित्य जमा करून घेतले जात होते. मतदान कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी पीएमपीएमएलच्या १०२ बसेस, ८ मिनीबस आणि १२ जीपची व्यवस्था करण्यात आली होती.

सखी मतदान केंद्र आणि आदर्श मतदान केंद्र

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी यावेळी थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयांमध्ये १९५ क्रमांकाचे मतदान केंद्र ‘सखी मतदान केंद्र’ म्हणून तयार करण्यात आले होते. या ठिकाणी सर्व महिला अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली होती.शिवाय या केंद्राची विशेष रचनाही तयार करण्यात आली होती. रावेत येथील बबनराव भोंडवे शाळेमधील २३ क्रमांकाचे केंद्र तसेच वाकड येथील महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील ३९५ आणि ४०५ क्रमांकाचे केंद्र आदर्श मतदान केंद्र (मॉडेल पोलिंग स्टेशन) म्हणून तयार करण्यात आले होते.या उपक्रमाचे मतदारांनी भरभरून कौतुक केले.

चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होती. सुट्टीचा दिवस आणि पोटनिवडणुकीत मतदानाकडे पाठ फिरविण्याचा कल या वेळी बदललेला दिसला. अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच रांगा लागल्या. मतदानानाने दुपारनंतर वेग घेतला. मतदारसंघांत पैसे वाटल्याचे आरोप-प्रत्यारोप, प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून आचारसंहिता भंगाच्या झालेल्या तक्रारी आणि काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये झटापट अशा किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत झाले. भाजप जागा कायम राखणार, की महाविकास आघाडी धक्का देणार, याचा निर्णय गुरुवारी होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments