महानगरपालिकेकडून या पाण्याची चाचणी करण्यात आली. त्यात पाणी स्वच्छ असल्याचं आढळलं. तर, रुग्णालयाद्वारे करण्यात आलेल्या तपासणीत मात्र या पाण्यात ईकोलाई आणि क्लासरडियम विषाणू असल्याचं आढळलं आहे.
मागील दोन, तीन दिवसांपासून जोर धरलेल्या पावसामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. जवळपास प्रत्येक घरात एक तरी व्यक्ती खोकला किंवा सर्दीने हैराण पाहायला मिळतेय. तर दुसरीकडे छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये अतिसार म्हणजेच डायरियाला लोक वैतागले आहेत. अतिसाराने आतापर्यंत पाचजणांनी आपला जीव गमावला आहे. गुरुवारी याठिकाणी पाचवा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हथनी गावच्या रहिवासी असलेल्या 32 वर्षीय परमेश्वरी या महिलेचा सिम्स रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. इराणी भागातून ज्या पाईपलाईनमधून पाणीपुरवठा होतो, त्यात लिकेज असून त्यातून नाल्याच्या पाण्यासह पावसाचं पाणी येत असल्याचं येथील स्थानिकांचं म्हणणं आहे. हे दूषित पाणी प्यायल्यानेच लोक आजारी पडत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
महत्त्वाचं म्हणजे तेथील महानगरपालिकेकडून या पाण्याची चाचणी करण्यात आली. त्यात पाणी स्वच्छ असल्याचं आढळलं. तर, दुसरीकडे सिम्स रुग्णालयाद्वारे करण्यात आलेल्या तपासणीत मात्र या पाण्यात ईकोलाई आणि क्लासरडियम विषाणू असल्याचं आढळलं आहे. त्यामुळे आता पाण्याबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला असून हे पाणी प्यायला लोक घाबरू लागले आहेत. हे दोन्ही अहवाल लक्षात घेऊन खरंच दूषित पाणीपुरवठा होत असेल तर त्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, नागपूरच्या नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड ऑफ लॅबोरेटरीजकडून देशभरातील जलचाचणी प्रयोगशाळांना मान्यता दिली जाते. त्यासाठी काही मापदंड ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार, जिवाणूशास्त्रीय चाचण्यांसह पाण्याच्या सर्व प्रकारच्या चाचण्यांसाठी योग्य मशीन उपलब्ध असणं आवश्यक असतं. परंतु बिलासपूर महानगरपालिकेच्या प्रयोगशाळेकडून यापैकी सर्व मापदंडांची पूर्तता झालेली नाही, त्यामुळे नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड ऑफ लॅबोरेटरीजकडून त्यांना पाणी तपासण्यासाठी मान्यता देण्यात आलेली नाही.