पिंपरी चिंचवड शहराचा वेगळा ठसा उमटवण्यात सर्वांचा महत्वाचा वाटा असून शहराच्या वाढत्या विकासाचा आलेख पाहता सेवेची गुणवत्ता कायम राखून शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महापालिका नेहमीच प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सेवा बजावत असताना स्वतःच्या आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष देत तणावमुक्त जीवन जगावे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरलिकेच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये महापालिका अधिकारी कर्मचा-यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे सह शहर अभियंता ज्ञानेश्वर जुंधारे, उप आयुक्त संदीप खोत, मनोज लोणकर, विठ्ठल जोशी, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, बाळासाहेब खांडेकर, वामन नेमाणे, प्रशांत जोशी, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराचा वारसा आणि इतिहास मोठा आहे. तसेच भारतातील वेगवान औद्योगिकीकरण आणि शहरीकरण होणा-या शहरांपैकी पिंपरी चिंचवड शहर हे एक आहे. शहराचा सर्वांगीण विकास साधताना आपल्यापुढे हवामान बदलाचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी शाश्वत विकास या संकल्पनेला मूर्त रूप देणे काळाची गरज आहे. अधिक रुंद रस्त्यांचे शहर अशी आपल्या शहराची ओळख आहे. ती कायम राखण्यासाठी नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देताना भविष्यातील निर्माण होणाऱ्या समस्यांचा विचार करून विकास आराखडा तयार करून त्याची जास्तीत जास्त प्रमाणात अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेने उचललेल्या पावलाचे देशभरातून कौतुक होत आहे. सर्वांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. यातून प्रेरणा घेऊन अनेक खाजगी क्षेत्रातील आस्थापना तृतीयपंथीय समूहाला रोजगार उपलब्ध करून देत आहेत. या नगरीचा झपाट्याने विकास होत असून स्मार्ट सारथी अॅप हे नागरिकांच्या समस्यांचे निराकारण करण्यासाठी प्रभावी माध्यम ठरत आहे. यातून अनेक महापालिका व शासकीय आस्थापना प्रेरणा घेऊन अनुकरण करत आहेत, असेही ते म्हणाले.
दरम्यान, वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम तसेच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी या स्पर्धांमध्ये हिरिरीने सहभाग घेऊन मनसोक्त आनंद घेतला. क्रीडा स्पर्धांमध्ये बुद्धिबळ स्पर्धा, बॅडमिंटन स्पर्धा, रायफल शुटींग (नेमबाजी), क्रिकेट, कॅरम रस्सीखेच, संगीत खुर्ची या स्पर्धांचा समावेश होता. तर मैदानी स्पर्धांमध्ये थाळीफेक, गोळाफेक, १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे आणि लांबउडी या स्पर्धांचा समावेश होता. क्रीडा स्पर्धा महिला आणि पुरुष अशा स्वतंत्र गटांत घेण्यात आल्या. तसेच ४० वर्षांवरील आणि ४० वर्षांखालील अशा वेगवेगळ्या गटांत वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा पार पडल्या. या सर्व स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या स्पर्धकांना तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकेच्या गुणवंत अधिकारी कर्मचाऱ्यांचा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सत्कार करून बक्षीस व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
तत्पूर्वी, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी “चला निरोगी जगूया ” या विषयावर आधारित आरोग्य विषयक मार्गदर्शन आयोजित केले होते. आयुर्वेद तज्ञ डॉ. शिवरत्न शेटे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने गीत गायन तसेच नृत्य सादर करत वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.