१२ फेब्रुवारी २०२०,
मावळातील अकरा शेतक ऱ्यांनी आठ वर्षांपूर्वी एकत्र येऊन पवना फूल उत्पादक संघाची स्थापना केली आणि त्या माध्यमातून सामूहिक फूलशेतीला सुरुवात केली. बघता बघता सामूहिक फूलशेतीचे रोपटे आता चांगले बहरले आहे. साडेतीन एकरांवर सुरू केलेल्या या फूलशेतीचा विस्तार २५ एकरांपर्यंत झाला असून या शेतीत शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केलेल्या गुलाबांची निर्यात व्हॅलेंटाइन डे म्हणजेच प्रेमदिनासाठी करण्यात येत आहे.
समूहशेतीत आणखी दहा एकर जागेवर फूलशेती करण्यात येणार असून पुढील वर्षी ३५ एकरांवर फुलांची लागवड करण्यात येणार आहे. निसर्गाचा वरदहस्त, चांगले वातावरण आणि मुबलक पाण्यामुळे मावळ तालुक्यातील वातावरण फूलशेतीला पोषक ठरले आहे. गेल्या काही वर्षांपासून व्हॅलेंटाइन डेसाठी मावळातील गुलाब फुले मोठय़ा प्रमाणावर निर्यात करण्यात येत आहेत.
फूलशेती फायदा मिळवून देणारी असली, तरी खर्चिक असल्याने सामान्य शेतक ऱ्यांना परवडणारी नव्हती. त्यासाठी मावळातील चंद्रकांत कालेकर, ज्ञानेश्वर ठाकर, मुकुंद ठाकर, ज्ञानेश्वर आडकर, विश्वनाथ जाधव, विष्णू आडकर, तानाजी शेंडगे, संतोष ठुले, प्रदीप आमले, वसंत कालेकर, भारत घरदाळे आदींनी पवना फूल उत्पादक संघाच्या माध्यमातून २०१२ मध्ये सामूहिक फूलशेतीचा प्रयोग राबविला. अकरा शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर फुलांची लागवड केली. प्रारंभी साडेतीन एकर जागेवर फुलांची लागवड करण्यात आली होती. हा प्रयोग यशस्वी झाला. सामूहिक शेतीमुळे मनुष्यबळही उपलब्ध झाले. फुलशेती नफा मिळवून देणारी असल्याने दरवर्षी सामूहिक शेतीचे क्षेत्र वाढविण्यात आले. शासनाने अनुदान दिल्याने गेल्या आठ वर्षांत २५ एकर जागेवर फुलांची लागवड करण्यात आली.
मावळ तालुक्यातील फुलांच्या लागवडीचा विचार करता एकूण अडीच ते तीन हजार एकर क्षेत्रावर फुलांची लागवड केली जात आहे. विविधरंगी गुलाब,जरबेरा, झेंडू आदी प्रकारांच्या फुलांची लागवड मावळात केली जात आहे.सुरुवातीच्या काळात भांडवलदार कंपन्यांनी हरितगृहांच्या (पॉलीहाउस) माध्यमातून मावळात फूल शेतीचा प्रयोग राबाविला.हा प्रयोग यशस्वी ठरल्याने मावळातील शेतक ऱ्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तेची जोड देत फुलांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली.
यंदा अवेळी झालेला पाऊस तसेच वातावरणातील बदलांमुळे फुलांची लागवड होण्याच्या कालावधीत बदल झाला. फुले उशिरा तयार झाल्याने कालावधी वाढला. बुधवारी (१२ फेब्रुवारी) गुलाब फुलांची शेवटची निर्यात परदेशात होणार आहे. यंदा व्हॅलेंटाइन डेसाठी परदेशात ७० ते ७५ लाख गुलाब फुलांची निर्यात करण्यात येणार आहे. उर्वरित फुले देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी पाठविली जाणार आहेत. यंदा फुलांचा तुटवडा जाणवत असल्याने भाव देखील चांगले मिळाले आहेत.
सामूहिक शेतीमुळे फुलांचा दर्जा आणि उत्पादन स्थिर ठेवण्यासाठी फायदा झाला. बी-बियाणे, औषधे खरेदी करताना सवलत मिळू लागली. मनुष्यबळ वाढल्याने कामाचे योग्य नियोजन करणे शक्य झाले. पूर्वी एकाच ठिकाणी फुलांचे उत्पादन घेतले जात होते. सामूहिक शेतीच्या माध्यमातून क्षेत्र वाढले. त्यामुळे दर्जेदार फुलांचे उत्पादन घेणे तसेच निगराणी करणे शक्य झाले. बाजारात फुले विक्रीस पाठविताना येणाऱ्या अडचणी कमी झाल्या. आजमितीला पवना फूल उत्पादक संघाचे २७ सभासद झाले आहेत.
– मुकुंद ठाकर ,अध्यक्ष, पवना फूल उत्पादक संघ
गुलाब निर्यातीत मावळ तालुक्याचा साठ टक्के वाटा
मावळ तालुक्यातून व्हॅलेंटाइन डेसाठी विविध देशांत गुलाबांची फुले पाठवली जातात. फुलांच्या निर्यातीत मावळ तालुक्याचा वाटा साठ टक्क्य़ांपेक्षा जास्त आहे. विवाह सोहळा, वाढदिवस तसेच खासगी समारंभांसाठी वर्षभर फुलांना मागणी असते. अनेक तरुण फूलशेतीकडे आकर्षित झाले असून सामूहिक शेतीच्या माध्यमातून मशागत, औषध फवारणी, विपणन, वाहतूक या कामांची विभागणी करण्यात आली आहे.