Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्रमहापालिकेच्या अग्निशमन विभागात ४ अग्निशमन वाहने नव्याने दाखल

महापालिकेच्या अग्निशमन विभागात ४ अग्निशमन वाहने नव्याने दाखल

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सक्षम असणे गरजेचे असून त्या दृष्टीने महापालिकेने अग्निशमन विभागाचे सक्षमीकरण सुरू केले आहे. अदयावत अग्निशमन वाहने, पुरेसे अग्निशमन केंद्र आणि आवश्यक अग्निशमन जवान उपलब्ध करून देण्यावर महापालिका प्रशासन भर देत आहे. त्यामुळे अग्निशमन दल सक्षम होत असून शहरवासियांच्या सेवेसाठी अधिक क्षमतेने कार्यरत राहील, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

महापालिकेची अग्निशमन यंत्रणा बळकट करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका विविध उपक्रम राबवित असते. याच अनुषंगाने महापालिकेने नव्याने १५ अग्निशमन वाहने ताफ्यात दाखल केली जाणार आहेत. त्यातील ४ वाहने आज दाखल झाली असून या वाहनांचे लोकार्पण आज आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य इमारतीत करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, अग्निशमन विभागाचे  उप आयुक्त मनोज लोणकर, यांत्रिकी विभागाचे  सह शहर अभियंता बाबासाहेब गलबले, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, कार्यकारी अभियंता कैलास दिवेकर, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, विशेष अधिकारी किरण गायकवाड, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे आदी उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, नागरिकांची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पालिकेचा अग्निशमन विभाग कटिबध्द आहे. नवीन वाहने ताफ्यात समाविष्ट झाल्याने अग्निशमन यंत्रणेच्या बळकटीकरणाच्या दिशेने पडलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील यांनी खरेदी प्रक्रियेतील नियोजन आणि अंमलबजावणीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, अग्निशमन विभागासाठी चार वाहनांच्या केलेल्या खरेदीमुळे आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देण्याची क्षमता वाढली असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही कायम वचनबद्ध आहोत.

उपायुक्त मनोज लोणकर म्हणाले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांच्या सुरक्षतेसाठी आधुनिक फायर टेंडर्समुळे आपत्कालीन परिस्थितीला त्वरीत प्रतिसाद देण्याची पालिकेच्या क्षमतेमध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे.

आज दाखल झालेली अग्निशमन वाहने ही आधुनिक प्रणालीची असून या सर्व वाहनांमध्ये आधुनिक यंत्रसामुग्री आहे. या वाहनांमध्ये  असलेल्या सर्व प्रणालींची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी घेतली. अग्निशमन विभागाच्या ताफ्यात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या वाहनांमध्ये विविध विशेष वाहनांचा समावेश आहे. यामध्ये ७० मीटर एरियल लॅडर प्लॅटफॉर्म, ५४ मीटर आणि ३२ मीटर टर्न टेबल लॅडर्स, वॉटर कॅनन्स, श्वास उपकरण वाहन, ड्राय केमिकल पावडर वाहन, फोम टेंडर आणि आधुनिक प्रकारच्या बचाव करणाऱ्या वाहनांचा समावेश आहे.

गुरुवारी समाविष्ट झालेल्या चार वाहनांमुळे आता अग्निशमन विभागाकडे एकुण वाहनांची संख्या ३२ इतकी झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी येत्या काळात आणखी १४ नवीन वाहनांची खरेदी करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments