‘जी-२०’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने शहरातील ७७ ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याअंतर्गत २७ हजार ८१९ किलो सुका कचरा, ३ हजार ७२४ किलो ओला कचरा, ४ हजार किलो राडारोडा, असा एकूण ३५ हजार ५४३ किलो (३५ टन) कचरा संकलित करण्यात आला.
लोकसहभागातून सार्वजनिक स्वच्छता करण्यासाठी महापालिकेच्या वतीने या मोहिमेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. शहरातील सर्व पंधरा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध सार्वजनिक रस्ते, वस्ती परिसर, शहरातील ऐतिहासिक स्थळे आणि पर्यटनस्थळे अशा विविध ठिकाणी या स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
शहरामध्ये आगामी आठवड्यात ‘जी-२०’ परिषद होणार आहे. त्यामध्ये विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर स्वच्छ आणि सुंदर शहर असा शहराचा संदेश जगभर पोहोचावा, या दृष्टीने महापालिका प्रशासनाने स्वच्छतेवर भर दिला आहे. त्या दृष्टीने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे स्वच्छता मोहिमेचे रविवारी सकाळी सात ते नऊ या वेळेत आयोजन केले होते. या मोहिमेचे उद्घाटन शनिवार वाड्याच्या प्रांगणात झाले. या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व अन्य वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, विविध स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.