शासकीय दस्ताऐवजांवर उमेदवाराच्या नावापुढे आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याबाबतच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी पिंपरी चिंचवड महापालिका करणार असून त्याबाबतचे निर्देश महापालिकेच्या प्रशासन विभागामार्फत सर्व विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत.
महिलांना पुरुषांबरोबर समानतेची वागणूक देण्यासाठी, समाजामध्ये महिलांप्रती सन्मानाची भावना निर्माण करण्यासाठी तसेच एकल पालक महिला यांची संतती (अनौरस संतती) यांना देखील समाजामध्ये ताठ मानाने जगता यावे यासाठी शासकीय दस्ताऐवजांवर उमेदवाराचे नाव, आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नाव नोंदविणे बंधनकारक करण्याबाबतच्या धोरणात्मक निर्णयास राज्यशासनाच्या महिला व बाल विकास विभागाने मान्यता दिली आहे. या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबतचे निर्देश राज्यशासनाच्या वतीने महापालिकेला प्राप्त झाले आहेत.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे, महसुली दस्ताऐवज, जन्म व मृत्यू नोंदी दाखला, सेवा पुस्तक विविध परीक्षांचे आवेदनपत्रे इत्यादी शासकीय दस्ताऐवजांमध्ये आईचे नाव वेगळ्या स्थंभामध्ये दर्शविण्यात येते. मात्र नव्या निर्णयानुसार आईच्या नावाचा सामावेश वेगळ्या स्थंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नाव, आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नाव नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे. दि. १ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना हा निर्णय लागू असणार आहे.
राज्यशासनाच्या नवीन निर्णयानुसार जन्म दाखला, शाळा प्रवेश आवेदनपत्र, सर्व शैक्षणिक कागदपत्रे, जमिनीचा सातबारा, संपत्तीचे सर्व कागदपत्रे, शासकीय अथवा निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक, सर्व शासकीय अथवा निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन चिट्ठी, शिधावाटप पत्रिका, मृत्यू दाखला सेवा पुस्तक इत्यादी कागदपत्रांवर आईचे नाव उमेदवाराच्या नावापुढे लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यशासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी महापालिकेच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली आहे.