Sunday, August 16, 2026
Homeताजी बातमीआजपासून २७ वा स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव; पिंपरी-चिंचवडमध्ये दोन दिवस सांस्कृतिक मेजवानी

आजपासून २७ वा स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव; पिंपरी-चिंचवडमध्ये दोन दिवस सांस्कृतिक मेजवानी

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित २७ व्या स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाला आज (२७ जुलै) पासून चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात प्रारंभ होत असून, पुढील दोन दिवस शहरातील रसिकांना संगीत, नृत्य आणि भारतीय संस्कृतीची अनोखी मेजवानी अनुभवता येणार आहे. महोत्सवातील सर्व कार्यक्रमांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी ७ वाजता डॉ. सुमेधा गाडेकर आणि त्यांच्या सहकलाकारांकडून ‘नृत्य गाथा’ (भक्ती, शक्ती, संस्कृती) हा नृत्याविष्कार सादर केला जाणार आहे. त्यानंतर सुप्रसिद्ध तबलावादक व सतारवादक पंडित नयन घोष यांना प्रतिष्ठेचा ‘स्वरसागर पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल.

यानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका सावनी रवींद्र यांच्या ‘भाव सप्तक – सावन सरी’ या पावसाळ्यावर आधारित मराठी व हिंदी चित्रपट गीतांच्या मैफलीने पहिल्या दिवसाचा समारोप होईल.

मंगळवार (२८ जुलै) रोजी सायंकाळी ७ वाजता सुवर्णा बाग यांच्या शिष्यांचा नृत्यजल्लोष सादर होईल. त्यानंतर आदिती रवींद्र कोंढे यांच्याकडून ‘देवी कौतुकम्’ या संकल्पनेवर आधारित भरतनाट्यमची प्रस्तुती रंगणार आहे. महोत्सवाचा समारोप सुप्रसिद्ध गायिका विदुषी सानिया पाटणकर यांच्या अभंग आणि शास्त्रीय संगीतावरील विशेष गायन कार्यक्रमाने होणार आहे.

यंदा २७ व्या वर्षात पदार्पण केलेल्या या महोत्सवाच्या माध्यमातून भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांनी या सांस्कृतिक पर्वात सहभागी होऊन कलाकारांच्या कलेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन मुख्य संयोजक प्रवीण तुपे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments