२६ मार्चपासून IPL सामन्यांना सुरूवात होणार ….
महाराष्ट्रात होत असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या सामन्यांसाठी स्पर्धेच्या सुरुवातीच्या दिवसांत स्टेडियममध्ये २५ टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने आपला निर्णय जाहीर केला आहे. आठ दिवसांनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन स्टेडियममध्ये 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्याची राज्य सरकारची तयारी आहे. येत्या २६ मार्चपासून IPL सामन्यांना सुरूवात होणार आहे. २२ मेपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत आज दुपारी १२.३० वाजता सह्याद्री अतिथी गृह येथे बैठक पार पडली. या बैठकीत स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीस परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रात होत असलेल्या आगामी IPL सामन्यांच्या आयोजनाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.या बैठकीला मुंबई पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, मुंबई पोलीस दलातील उच्च पदस्थ अधिकारी यांच्यासह मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) पदाधिकारी आणि BCCI चे CEO उपस्थित होते.
२६ मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर पहिल्या सामना… !
आयपीएल २०२२ साठीचा महालिलाव तीन आठवड्यांपूर्वी पार पडला. आता प्रेक्षकांसह सर्व क्रिकेटपटूंना स्पर्धेचे वेध लागले आहेत. आयपीएल २०२२ मधला पहिला सामना २६ मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स रायडर्स हे आयपीएलच्या १५ व्या सीझनच्या पहिल्या सामन्यात भिडतील. चेन्नई सुपरकिंग्स हा संघ सध्या गतविजेता आहे. आत्तापर्यंत असे दिसून आले आहे की, आयपीएलचा पहिला सामना खेळण्याची संधी नेहमीच गतविजेत्या संघाला मिळते. त्यामुळे CSK ची निवड करण्यात आली आहे. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्स हा संघ गतवर्षी उपविजेता ठरला होता. हा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या सामन्यात चेन्नईशी दोन हात करणार आहे. यावेळी आयपीएलचे लीग स्टेजचे सामने मुंबई आणि पुण्यातच खेळवले जाणार आहेत. आयपीएल २०२२ मध्ये १०संघ आहेत आणि ते प्रत्येकी पाचच्या दोन गटात विभागले गेले आहेत. सर्व संघ आपापसात किमान एक सामना नक्कीच खेळतील.
संघांच्या वाहतुकीसाठी रस्त्यांवर स्वतंत्र लेन….!
संघांना हॉटेलमधून सामने खेळताना आणि सरावासाठी जाताना रहदारीचा सामना करावा लागणार नाही. संघांच्या वाहतुकीसाठी रस्त्यांवर स्वतंत्र लेन असेल. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर ५५ सामने खेळवले जाणार आहेत. याशिवाय१५ सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहेत. बीसीसीआयने सराव सुविधांसाठी वांद्रे-कुर्ला संकुल आणि ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमची निवड केली आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ कुठल्या संघाविरुद्ध किती सामने खेळणार..!
मुंबई इंडियन्सचा संघ कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंटस आणि चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध प्रत्येकी दोन-दोन सामने खेळणार आहे. सनरायजर्स हैदराबाद, RCB, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स विरुद्ध प्रत्येकी एक-एक सामना खेळणार आहे.


