२५ नोव्हेंबर
मूळचे सांगली जिल्ह्यातील असलेले मराठा उद्योजक शिवश्री जयसिंग वसंतराव गायकवाड यांची मराठा सेवा संघाच्या केरळ राज्य प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती पुणे येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली. मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शिवश्री विजयकुमार ठुबे यांचे हस्ते शिवश्री जयसिंगराव गायकवाड यांना ज्येष्ठ विचारवंत व वक्ते शिवश्री गंगाधर बनवरे व मराठा सेवा संघाचे केरल राज्य प्रभारी शिवश्री प्रकाश जाधव यांचे उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले. सदर नियुक्ती मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार, राष्ट्रीय सचिव शिवश्री कमलेश पाटील व राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. सोपान क्षीरसागर यांचे आदेशानुसार करण्यात आली.
शिवश्री जयसिंग गायकवाड हे गेली २४ वर्षांपासून त्रिशूर केरल येथे सोने-चांदी तसेच बेकरी व्यवसाय करतात. ते अखिल भारतीय मराठी बांधव प्रबोधन समिती, केरळचे संस्थापक अध्यक्ष आहेत. सन २००४ पासून केरळ राज्यात विविध चर्चासत्र, संमेलने, व्याख्याने यांच्या माध्यमातून प्रबोधन करतात. तसेच ते मराठा गोल्ड अँड सिलव्हर ड़िफायनरी असोसिएशनच्या माध्यमातून केरळ राज्यातील मराठा सोने-चांदी व्यावसायिकांचे सन २००१ पासून प्रश्न सोडविण्यासाठी मदत करतात.
सदर बैठकीत प्रकाश जाधव यांनी प्रास्ताविक केले, ज्येष्ठ विचारवंत गंगाधर बनबरे यांनी मराठा सेवा संघाची भूमिका, जिजाऊ सृष्टी व बळीराजा संशोधन केंद्राची माहिती दिली. केरळच्या सांस्कृतिक, भौगोलिक इतिहासाची माहिती दिली.
मराठा सेवा संघ राष्ट्रीय कार्याध्यक्ष विजयकुमार ठुबे यांनी मराठा सेवा संघाच्या देशभर चाललेल्या कार्याची माहिती दिली. बैठकीची सुरुवात जिजाऊ ब्रिगेडच्या शिवमती उषा पाटील यांच्या जिजाऊ वंदना व समारोप संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी आभार व्यक्त करून करण्यात आली.
केरळचे नूतन प्रदेशाध्यक्ष शिवश्री जयसिंग गायकवाड यांनी आपल्या मनोगतात येत्या सहा महिन्यात प्रदेश कार्यकारिणी तसेच सर्व जिल्हा शाखा पदाधिकाऱ्यांच्या निवडी पूर्ण करणार असल्याचे सांगितले तसेच मराठा सेवा संघाचे कार्य सहकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यभर पोहचविणार असे सांगितले.
या बैठकीला शिवश्री रघुवीर तुपे, टिळक भोस, सचिन आडेकर, सुनिल साळुंके, साहेबराव साळुंके, संपतराव जगताप, प्रविण कदम, मनोज गायकवाड, इत्यादी मान्यवरांसह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.