१७ ऑगस्ट २०२१,
शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर शनिवारी पहिल्याच दिवशी राज्यभरातून ९४ हजार ४४७ अर्ज दाखल झाले होते. सोमवारी सायंकाळपर्यंत २ लाख १० हजार ५६३ अर्ज दाखल झाले. त्यात अमरावतीतून ४ हजार २३४, मुंबईतून १ लाक ४४ हजार २७६, नागपूरमधून ८ हजार ४६, नाशिकमधून ११ हजार ६३१, पुणे-पिंपरी चिंचवडमधून ४२ हजार ४६६ अर्ज भरले गेले आहेत. त्यापैकी ८५ हजार ८६५ अर्जाची संगणकीय पडताळणी (ऑटो व्हेरिफिके शन) झाली, तर एकूण १ लाख ३९४ अर्जाची पडताळणी झाली आहे.
मुंबई, अमरावती, नाशिक, नागपूर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात राबवल्या जाणाऱ्या अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत २ लाख १० हजार ५६३ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अर्ज केले आहेत. सर्वाधिक १ लाख ४४ हजार २७६ अर्ज मुंबईतील विद्यार्थ्यांनी दाखल के ले असून, प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना २२ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येणार आहे.
उच्च न्यायालयाने अकरावीच्या प्रवेशासाठीची सीईटी रद्द करून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिल्याने शिक्षण विभागाकडून सहा महापालिका क्षेत्रातील ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया शनिवारपासून सुरू करण्यात आली. राज्यातील उर्वरित भागात महाविद्यालय स्तरावर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल. यंदा दहावीचा निकाल उंचावल्याने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयात प्रवेशासाठीचे पात्रता गुण वाढणार आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी, विशेषत: नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी चुरस होणार आहे.


