पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी-पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेने वेगाने मदतकार्य सुरू ठेवले असून, आज (६ जुलै) दुपारी १२ वाजेपर्यंत पूरबाधित भागांतील १,८८० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. पूरग्रस्तांसाठी विविध ठिकाणी निवारा केंद्रे उभारण्यात आली असून, तेथे भोजन, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महापालिकेचा आपत्ती नियंत्रण कक्षही २४ तास कार्यरत असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन नदीकाठच्या वस्त्यांतील नागरिकांना वेळेत सतर्क करण्यात आले असून, कोणतीही जीवित अथवा वित्तहानी टाळण्यासाठी त्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
पूरस्थितीचा आढावा घेताना आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की, पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरिकांना ध्वनीक्षेपकाद्वारे वेळेवर सूचना द्याव्यात आणि आवश्यकतेनुसार तातडीने स्थलांतराची कारवाई करावी. कोणत्याही परिस्थितीत अनुचित घटना घडू नयेत, यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आदेशही त्यांनी दिले.
निवारा केंद्रांमध्ये वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली असून, पूरबाधित नागरिकांची आरोग्य तपासणी व प्राथमिक उपचार केले जात आहेत. तसेच भोजन, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधांची कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्ष ०२०-६७३३११११ / ०२०-२८३३११११ किंवा अग्निशमन विभागाच्या ७०३०९०८९९१ या क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा.
या भागांवर प्रशासनाचे विशेष लक्ष
पूराचा सर्वाधिक धोका लक्षात घेऊन महापालिकेने भाटनगर, लेबर कॅम्प, किवळे, केशवनगर, जाधव घाट, काळेवाडी, पिंपळे निलख (पंचशील नगर), रामनगर, बोपखेल, संजय गांधी नगर, पिंपळे गुरव आणि लक्ष्मीनगर या नदीकाठच्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
निवारा केंद्रांतील नागरिकांची संख्या (६ जुलै, दुपारी २ वाजेपर्यंत)
• ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय – ३०० नागरिक
• ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय – ६३० नागरिक
• ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय – ९५० नागरिक
• ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय – २१० नागरिक
महापालिकेच्या विविध विभागांकडून पूरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


