१५ जून २०१५ रोजी रात्री २.३०च्या सुमारास कोथरूड परिसरातील त्रिमूर्ती कॉलनीत स्वप्नील रघुनाथ कुंभार (वय २८, रा. विजयनगर, ता. कराड) नामक तरुणाने आपल्या मैत्रिणीवर चाकूने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण शहर हादरलं होतं. आता ७ वर्षानंतर स्वप्नील कुंभार याला याप्रकरणी जन्मठेप आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा निकाल दिला.
स्वप्नील हा व्यवसायिक होता आणि तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत पुण्यात राहत होती. दोघांची ओळख झाल्यानंतर ते सातत्याने भेटत होते. या भेटींमधून स्वप्नील आणि तरुणी यांच्यात घट्ट मैत्री झाली होती. मात्र काही दिवसांतच स्वप्नील हा तरुणीवर हक्क गाजवू लागला. तिचा मोबाईल तपासणे, तिला इतरांशी बोलण्यास प्रतिबंध करणे, असे प्रकार तो करीत होता. त्यामुळे मुलीने त्याच्याशी बोलणे बंद केले.
१५ जून २०१५च्या रात्री स्वप्नील कुंभार हा तरुणीला भेटण्यासाठी कोथरूड परिसरात आला होता. रात्री उशिरापर्यंत या दोघांच्या गप्पा रंगल्या होत्या. मात्र, खूप उशीर झाल्याने तरुणीने रूमवर जायचं म्हणून ती निघाली. पण स्वप्नीलने तिला रोखले. ‘उशीर खूप झालाय मला रूमवर जायचे आहे’, असं तरुणीने सांगताच स्वप्निलच्या रागाचा पारा चढला आणि त्याने खिशातील चाकू काढून तरुणीवर १८ वार करत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आणि तिथून पळ काढला.
स्वप्नीलने केलेल्या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली होती. रक्तबंबाळ अवस्थेत ती रूमवर गेली आणि बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला रुममधील मैत्रिणीने तत्काळ रुग्णालयात दाखल केले व याबाबतची माहिती तिच्या वडिलांना दिली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास कोथरूड पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अरुण ओंबासे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी कामकाज पाहिले. हल्ल्यामुळे मुलीचे एक मूत्रपिंड पूर्ण फाटल्यामुळे ते काढून टाकावे लागले आहे. तसेच, उपचारांसाठी तिच्या कुटुंबीयांना आर्थिक भार सोसावा लागला. त्यामुळे न्यायालयाने दंडातील रकमेतील ७५ हजार रुपये मुलीला द्यावेत, असा युक्तिवाद ॲड. अगरवाल यांनी केला.