Saturday, September 30, 2023
Homeताजी बातमीमहापालिकेच्या जनसंवाद सभामध्ये नागरी सुविधांसाठी १३५ तक्रारी… जनतेच्या तक्रारीचे थेट निराकरण करण्याचे...

महापालिकेच्या जनसंवाद सभामध्ये नागरी सुविधांसाठी १३५ तक्रारी… जनतेच्या तक्रारीचे थेट निराकरण करण्याचे प्रभावी माध्यम ” जनसंवाद “

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या आदेशानुसार आज महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली. यामध्ये सुमारे १३५ नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारी आणि सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे १८ , ११ , ८ , २० , २० , १२ , २७ , आणि १९ नागरिकांनी जनसंवाद सभेत उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.

जनसंवाद सभेमध्ये विविध तक्रारी आणि सूचना मांडण्यात आल्या. यामध्ये मालमत्ता मालकी हक्काबाबत भोगवटादार म्हणून नाव असल्याने मालकी हक्क देणे , अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे, खंडित विद्युत पुरवठा पुर्ववत करणे, रस्त्यांवरील पथदिवे दुरुस्त करणे आणि नव्याने बसवणे, उच्च दाबाने सुरळीत पाणीपुरवठा करणे, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, रस्ता डांबरीकरण करणे, रहदारीच्या रस्त्यांवर गतिरोधक आणि दुभाजक बसवणे, ड्रेनेज लाईन दुरुस्ती करणे, आवश्यक ठिकाणी नव्याने ड्रेनेज वाहिन्या टाकणे, सार्वजनिक शौचालये उभारणे, भुयारी मार्गांमध्ये सुरक्षारक्षक नेमणे, बेकायदेशीर वृक्षतोड थांबवून वृक्षारोपण करणे, बंद असलेले जलतरण तलाव सुरु करणे, ओपन जिमची दुरुस्ती करणे, रस्त्याच्या कडेला पार्किंग करण्यात येणाऱ्या गाड्यांमुळे होणारी अडचण दूर करणे, हॉकर्सझोन बाबत निर्णय घेणे, वाढीव पाणी बीलांच्याबाबतीत प्रश्न सोडवणे, कचरा संकलनासाठी छोटे वाहन उपलब्ध करून देणे, नदी प्रदुषण विषयक समस्या, आरोग्य आणि स्वच्छता विषयक समस्या आदी प्रश्न मांडण्यात आले.

अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह, या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अनुक्रमे बीआरटीएसचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, बांधकाम परवानगी विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम, भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, नागरवस्ती विभागाचे उप आयुक्त अजय चारठणकर, सह शहर अभियंता सतीश इंगळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी भूषवले.

आठही क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत क्षेत्रीय अधिकारी अनुक्रमे लेखाधिकारी शिवाजी लोखंडे , अभिजित हराळे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड , राजेश आगळे, सीताराम बहुरे, रविकिरण घोडके, विजयकुमार थोरात, यांच्यासह स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.

जनसंवाद हा उपक्रम लोकाभिमुख असून जनतेच्या तक्रारीचे थेट निराकरण करण्याचे प्रभावी माध्यम महापालिकेने उपलब्ध करून दिले आहे. याद्वारे नागरिकांच्या समस्यांचे अल्प कालावधीत निराकरण होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments