४ एप्रिल २०२१,
फुरसुंगी येथील ‘एसपी इन्फोसिटी’ कंपनीच्या बांधकाम इमारतीवर काम करणाऱ्या १७६ करोनाबाधित श्रमिकांपैकी सव्वाशे मजूर ‘लेबर कॅम्प’मधून पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे सर्व श्रमिक बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश या त्यांच्या मूळ गावी गेल्याची शक्यता असून, या घटनेमुळे लेबर कॅम्पच्या ठेकेदाराकडून पुन्हा एकदा निष्काळजीपणा झाल्याचे समोर आले आहे.
फुरसुंगी, भेकराईनगर येथे ‘एसपी इन्फोसिटी’च्या बांधकाम इमारतीचे काम चालू होते. या ठिकाणी काम करणाऱ्या १७६ श्रमिकांना टप्याटप्याने करोनाचा संसर्ग झाला होता. सुरुवातीला बाधित झालेल्या ६८ जणांना लेबर कॅम्पमध्ये क्वारंटाइन केले होते. त्यानंतर पुन्हा बाधित श्रमिक आढळल्याने सर्वांना अवधूतनगर येथील लेबर कॅम्पमध्ये क्वारंटाइन केले गेले. हे श्रमिक बाहेर येऊ नयेत आणि त्यांना लागणाऱ्या सर्व सुविधा देण्याची जबाबदारी ठेकेदाराची होती. मात्र, ठेकेदाराने लेबर कॅम्पकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे येथील कॅम्पमधील श्रमिक रात्रीत हळूहळू गावाकडे पळून गेले. सर्व श्रमिक बिहार, झारखंड व उत्तर प्रदेश या भागांत राहणारे होते. करोनाच्या भीतीने लेबर कॅम्पमधून त्यांनी पळ काढला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. बाधित मजुरांमुळे आणखी किती जणांना करोनाचा संसर्ग झाला, हे सांगणे अवघड झाले आहे. महापालिकेचे आरोग्य निरीक्षक नवनाथ शेलार यांनी शुक्रवारी लेबर कॅम्पमध्ये पाहणी केली असता तेथे फक्त चाळीस ते पन्नास मजूर दिसून आले.
लेबर कॅम्पवर ठेकेदाराने लक्ष ठेवणे गरजेचे होते. मात्र, सुरुवातीपासून त्यांनी दुर्लक्ष केले आहे. सुरुवातीला येथील सहा मजूर पळून गेले होते. त्यामुळे तत्काळ हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतरही ठेकेदाराने लक्ष दिले नसल्याने पुन्हा मजूर पळून गेल्याची माहिती मिळाली आहे. ही बाब गंभीर आहे.
- सोमनाथ बनकर, सहायक आयुक्त, महापालिका