पद्मावती येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहातील सुमारे दोन कोटी रुपयांचे बारा स्पीकर चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. या ‘स्मार्ट’ चोरट्यांनी चांगल्या दर्जाचे स्पीकर चोरून त्या जागी हलक्या दर्जाची यंत्रणा बसविली आहे. हा प्रकार सहा महिन्यांपूर्वी घडला असूनही महापालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे दिसून आले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात महापालिकेने सुमारे दोन कोटी रुपयांचे बारा स्पीकर बसविले होते.लॉकडाउनमध्ये सभागृह बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी स्पीकर चोरले आणि त्याजागी हलक्या दर्जाची यंत्रणा बसवली.ऑक्टोबरमध्ये सभागृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर विद्युत विभागाकडून स्पीकरची चोरी झाल्याचे सांस्कृतिक विभागाला पत्राद्वारे कळविण्यात आले होते.
चोरट्यांनी सभागृहातील ‘सीसीटीव्हीं’चीही तोडफोड केली आहे. हा प्रकार घडला त्या वेळी कार्यरत सुरक्षारक्षकांचे हजेरीपत्रकच उपलब्ध नसल्याचेही आढळून आले. या प्रकरणी नगरसेवक सुभाष जगताप यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत विचारणा केली असता, हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, सांस्कृतिक विभागाने या प्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. संबंधितांनी अद्याप नोटिशीला उत्तर दिलेले नाही. पालिकेने या प्रकरणाची माहिती घेतली असून, लवकरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक विभागप्रमुख संतोष वारूळे यांनी दिली.
घरचाच भेदी?
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहातील स्पीकरचोरीमध्ये पालिकेत कार्यरत असणाऱ्यांचाच ‘हात’ असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सभागृहात कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमलेले असूनही मोठमोठे स्पीकर कसे हलविण्यात आले या बाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.