Friday, June 13, 2025
Homeताजी बातमी१२ वर्षांच्या तपातून सलाखून निघालेली हिरकणी – सोनाली कुलकर्णी

१२ वर्षांच्या तपातून सलाखून निघालेली हिरकणी – सोनाली कुलकर्णी

२० ऑक्टोबर २०१९ – दिप्ती पवार ( न्यूज १४)
नटरंग चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या लावणीनृत्यातून वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गुणी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. कारकिर्दीच्या सुरुवातीला एक मॉडेल म्हणून काम केल्यांनतर सोनालीने केदार शिंदे यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून या चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.

नुकतेच सोनालीला या चंदेरी दुनियेमध्ये काम करताना १२ वर्षे पूर्ण झाली, म्हणजे एक तप पूर्ण झाले. या बारा वर्षात तिने साकारलेल्या विविध भूमिका याच तिची ओळख झाल्या आहेत. जसे कि, नवऱ्यासाठी अन्यायाचा डोंगर सर करून गेली ती “बकुळा”, इंद्राच्या दरबारातली सर्वांवर मोहिनी घालणारी “रंभा”, महाराष्ट्राची लावणी जगभरात पोहोचवणारी नटरंगची ती “अप्सरा”, अजिंठामधून प्रेम करायला शिकवणारी ती “पारो”, रमा माधव च्या ऐतिहासीक प्रेमकहाणीत नकारात्मक भूमिका साकारणारी “आनंदीबाई”, सावर रे मना या गाण्यातून झालेली ती “मितवा” ,लहान वयात आलेल्या समस्यांमुळे वेश्या बनलेल्या मुलीचा प्रवास म्हणजे “शटर” चित्रपट आणि आनंदाच्या शोधात निघालेली हंपी मधली ती “इशा” आणि या अशा ओळखींबरोबर ती आता एक नवीन ओळख घेऊन आपल्या समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक विलक्षणीय मातृत्वाचे उदाहरण म्हणजे “हिरकणी” हि भूमिका.

न्यूज १४ च्या मुलाखतीत बोलताना सोनालीने सांगितले कि, ‘जशी प्रत्येक सिनेमाची सुरुवात हि नव्याने होत असते तसेच ‘हिरकणी’ या चित्रपटातून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. राजेश मापुस्करांची निर्मिती असलेला प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिखित चित्रपटामागची हि मेहनत कौतुकास्पद आहे.हा चित्रपट करताना बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागले. हिरकणीच्या व्यक्तिरेखेला शोभेल अशी शरीरयष्टी व बांधा व्यवस्थित करण्यासाठी वजन कमी करून व्यायाम केला. मुळात एका शहरातील मुलगी असून खेडेगावातील एका गवळणीची भूमिका आत्मसात केली.नाक टोचून घेतले, कासाराकडून चुडा भरून घेतला, गायीचे दूध कसे काढायचे, शेण कसे सावरायचे, चुलीवरची भाकरी कशी बनवायची हे शिकले.बाळासोबत असलेले नातेसंबंध वाढवण्यासाठी आणि त्याला मातृत्वाचा लळा लावण्यासाठी त्याला जवळ जवळ तीन महिन्यांचा काळ दिला. भर पावसात हिरकणी बुरुजाची आणि रायगडाची पाहणी करायला गेलेल्या २५ जणांच्या युनिट ची मेहनत अशा आव्हानांना बेधडक सामोरे जाऊन अखेर हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.

पुढे सांगताना सोनाली म्हणाली, “आई हि आई असते. भलेही ती मुंबईच्या धावपळीच्या जीवनातली, मुलांच्या शिक्षणासाठी, संगोपनासाठी झटणारी आई असो व पुण्याच्या आयटी कंपनीमध्ये १०-१२ तास काम करणारी आई असो किंवा ग्रामीण भागातली दुष्काळाच्या झळा सोसणारी आणि स्वतःच्या रक्ताचं पाणी करून तिच्या चिमुकल्याला मायेचा घास भरवणारी ती माऊली असो. ३०० वर्षांपूर्वीच्या हिरकणीला कड्यांचे अडथळे होते. पण आता अडथळ्यांचे स्वरूप बददले आहे. परंतु मातृत्वाची भाषा हि युगानुयुगे तीच आहे. आजच्या युगातली हि हिरकणी जरी आपल्या लेकरापासून लांब एखाद्या ऑफिस मध्ये काम करीत असली तरी तिचे लक्ष हे पाळणाघरात असलेल्या तिच्या बाळाकडे असते. आपल्या बाळाच्या काळजीत बुडालेली परंतु त्याच्या संगोपनासाठी झिजणारी ती प्रत्येक आई हिरकणीच नव्हे का…..!!!
आपल्या बाळासाठी ‘दीड गाव खोल दरी’ असलेल्या कड्यावरून हिरकणी कशी उतरली हि कथा आपण शाळेत पाठपुस्तकातून वाचली आहे. परंतु त्या इतिहासातील काही न उलगडलेल्या गोष्टी आता चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. येत्या २४ ऑक्टोबर पासून ‘हिरकणी’ महाराष्ट्रातील सर्व सिनेमागृहात रिलीज होत असून सर्वांनी आवर्जून हा चित्रपट पाहावा .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments