१२ मार्च २०२०,
जागतिक आरोग्य संघटनेने ‘करोना विषाणू’ला महारोग म्हणून घोषीत केल्यानंतर जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यातच भारतात करोना रुग्णांची संख्या वाढल्याने त्याचे पडसाद गुरुवारी भांडवली बाजारात उमटले. ‘करोना’च्या भीतीने गाळण उडालेल्या गुंतवणूकदारांनी बाजार उघडताच जोरदार विक्री केली. यात सेन्सेक्स तब्बल २४०० अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७८० अंकांनी घसरून ९ हजार ६०० अंकांपर्यंत खाली आला आहे. दीड तासांत गुंतवणूकदारांना सुमारे ११ लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
आजच्या सत्रात सर्वच क्षेत्रांमध्ये धूळधाण उडाली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या मंचावरील एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस आणि एचडीएफसी या पाच शेअरने सेन्सेक्सच्या कोसळण्यात ७०० अंकांचा हातभार लावला. १७०० शेअर्सपैकी केवळ १६० शेअर्स तेजीत आहेत. निम्म्याहून अधिक शेअर्सनी सार्वकालीन नीचांकी स्तर गाठला आहे. सध्या सेन्सेक्स २४०० अंकांच्या घसरणीसह ३३००० अंकांपर्यंत खाली आला आहे. निफ्टी ७२७ अंकांच्या घसरणीसह ९७३१ अंकांवर आहे.
हवाई सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या शेअरला मोठी झळ बसली आहे. इंटरग्लोब एव्हिएशन आणि स्पाइस जेट हे शेअरमध्ये मोठी घसरण झाली. स्पाइस जेट १९ टक्क्यांनी घसरला. धातू उद्योगाला करोनाचा जबर फटका बसणार आहे. त्यामुळं धातू उद्योगाशी संबंधित शेअर्समध्ये मोठी पडझड झाली. जिंदाल स्टील आणि वेदांता १० टक्क्यांनी घसरले. आजच्या पडझडीचे परिणाम चलन बाजारावरदेखील दिसून आले. चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया ६४ पैशानी घसरला आहे. सध्या तो ७२.२८ वर ट्रेड करत आहे.