२६ नोव्हेंबर
झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लि. (झील) या समूहाचे प्रवर्तक सुभाषचंद्रा यांनी या कंपनीच्या अध्यक्षपद व संचालकपदाचा सोमवारी राजीनामा दिला. संचालक मंडळाने सुभाषचंद्रा यांचा राजीनामा स्वीकारला आहे, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले. मात्र ते झी समूहाच्या बिगर कार्यकारी संचालकपदी राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले. सुभाषचंद्रा यांनी या कंपनीतील भांडवलापैकी मोठा हिस्सा विकला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
सेबीच्या (भांडवली बाजार नियंत्रक) १७ (आयबी) या नियमास अनुसरून हा राजीनामा देण्यात आला आहे. कंपनीचे अध्यक्ष हे व्यवस्थापकीय संचालक वा सीईओंचे नातेवाईक नसावेत, असे हा नियम सांगतो. सुभाषचंद्रा यांचा राजीनामा त्वरित अंमलात येणार असून कंपनीने सहा स्वतंत्र संचालकांची नियुक्ती केली आहे.
सुभाषचंद्रा यांच्या नेतृत्वाखालील एस्सेल समूहाने झीमधील आपल्या मालकीचे १६.५ टक्के समभाग विकण्याचा अलीकडेच निर्णय घेतला होता. सप्टेंबरमध्ये त्यांनी ११ टक्के भांडवल विकले आहे. एस्सेल समूहावर सुमारे चार हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.