९ मार्च २०२०
जागतिक साहित्यात मराठी कवितेचे व्हिजीटिंग कार्ड असलेल्या नामदेव ढसाळ यांच्या स्मृती जपणारा सारं काही समष्टीसाठी हा लोकमंच पुन्हा आपल्या भेटीस येत आहे. कलावंत, लेखक, कविता आणि कवितेतून कलाविष्कार आणि राजकीय कृती साधणारा हा लोकमंच महाराष्ट्रास सुपरिचित आहे. येत्या १४ मार्च आणि १५ मार्च २०२० रोजी मुंबई विद्यापीठातील विद्यानगरी, कलीना येथील मराठी भाषा भवन येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कलाक्षेत्राने आपलं अभिजनपण जपण्याच्या नावाखाली आजपर्यंत विशिष्ट कलाप्रकारांनाच अवाजवी महत्त्व प्रदान करून आपली चौकट आखूड करून ठेवली आहे. या चौकटीत अभिजनेतर सौंदर्यशास्त्रांची मांडणी करणाऱ्या कोणत्याही कवी कलावंतांना स्थान नाही. ते स्थान सारं काही समष्टीच्या निमित्ताने आता निर्माण झाले आहे. तुम्हाला मंच मिळत नाही तर इथं या, हा लोकमंच सर्वांसाठी खुला आहे. अगदी या मंचाद्वारे साध्य होणाऱ्या कलेच्या राजकारणाविरोधात असणाऱ्यांचेही स्वागत इथे केले जाते.
यावर्षी देखील २०१९ सालच्या सोहळ्यप्रमाणे अनेक कलावंत सहभाग नोंदिवणार आहेत. अनेक चित्रकार, छायाचित्रकारांचे प्रदर्शन लेखक, लघूपट व माहीतीपटांचे प्रदर्शन, चित्रपट दिग्दर्शक, कवी, कलावंतांसोबत चर्चासत्रे, नाटककार, नाटकांचे मंचन, कथाकारांसोबत चर्चा, कथावाचन, कवितावाचन, पुस्तक विक्री व प्रकाशन आणि समष्टी पुरस्कारांचे वितरण असे एकुण शंभरहून अधिक कलाकारांद्वारे विविध कलांचे व कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे.