Friday, September 29, 2023
Homeताजी बातमी‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ दि. ११ ते दि. १५ डिसेंबर...

‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ दि. ११ ते दि. १५ डिसेंबर २०१९ दरम्यान होणार

२० नोव्हेंबर
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यावर्षी बुधवार दि. ११ डिसेंबर ते रविवार दि. १५ डिसेंबर, २०१९ या पाच दिवसांदरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे होणार आहे. महोत्सवाचे हे ६७ वे वर्ष असून या वर्षीच्या महोत्सवात कला सादर करणाऱ्या कलाकारांची नावे व महोत्सवाचे वेळापत्रक आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.

यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात तब्बल २९ कलाकार आपली कला सादर करतील. यात देशभरातील दिग्गज कलाकारांबरोबरच युवा पिढीतील कलाकार, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार यांबरोबरच परदेशी कलाकाराचा देखील समावेश असल्याची माहिती श्रीनिवास जोशी यांनी दिली.

महोत्सवाची वेळ पहिले तीन दिवस म्हणजेच बुधवार दि. ११ डिसेंबर ते शुक्रवार दि. १३ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते रात्रौ १० अशी तर चौथ्या दिवशी म्हणजेच शनिवार दि. १४ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते रात्रौ १२ अशी असेल. शेवटच्या दिवशी (रविवार दि. १५ डिसेंबर रोजी) महोत्सवाची वेळ दुपारी १२ ते रात्रौ १० असेल.

महोत्सवातील कार्यक्रमांचा तपशील पुढीलप्रमाणे –

बुधवार दि. ११ डिसेंबर रोजी सवाई गंधर्व यांचे ज्येष्ठ शिष्य व किराणा घराण्याचे जेष्ठ गायक पं. फिरोज दस्तूर यांचे शिष्य गिरीश संझगिरी यांच्या गायनाने ६७ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात होईल. हे वर्ष पं. फिरोज दस्तूर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. याचेच औचित्य साधत त्यांचे शिष्य असलेले संझगिरी त्यांना आदरांजली वाहतील. यानंतर जयंती कुमरेश यांचे कर्नाटकी शैलीतील वीणावादन होईल. यानंतर पं. माणिक वर्मा यांच्या शिष्या असलेल्या अर्चना कान्हेरे यांचे गायन होईल. पहिल्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरीवादनाने होईल.

गुरुवार दि. १२ डिसेंबरच्या दुस-या दिवसाची सुरुवात उस्ताद मशकुर अली खान यांचे शिष्य व किराणा घराण्याचे संदीप भट्टाचार्जी यांच्या गायनाने होईल. त्यानंतर झारखंडचे असलेले व केडिया बंधू म्हणून ओळखले जाणारे मनोज केडिया व मोर मुकट केडिया या बंधूंचे सरोद व सतार वादन होईल. यानंतर पुण्यातील मंजिरी कर्वे – आलेगांवकर आपली गायनसेवा सादर करतील. आलेगांवकर या जयपूर घराण्याचे गायक वामनराव देशपांडे यांच्या शिष्या आहेत. दुस-या दिवसाचा समारोप पं. शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनाने होईल.

शुक्रवार दि. १३ डिसेंबरच्या तिस-या दिवशी महोत्सवाची सुरुवात ‘धृपद सिस्टर्स’ म्हणून ओळखल्या जाणा-या व पं. रमाकांत आणि उमाकांत गुंदेचा यांच्या शिष्या असलेल्या अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फणसळकर आणि अनुजा बोरुडे यांच्या सादरीकरणाने होईल. यावेळी अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फणसळकर यांचे धृपद गायन तर अनुजा बोरुडे यांचे पखवाज वादन होईल. यानंतर भारतरत्न पं.

भीमसेन जोशी यांचे नातू व श्रीनिवास जोशी यांचे शिष्य व सुपुत्र विराज जोशी यांचे गायन होईल. त्यानंतर केन झुकरमन यांचे सरोदवादन होईल. केन झुकरमन हे मुळचे स्वित्झर्लंडचे असून ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अली अकबर खान यांचे शिष्य आहेत. तिस-या दिवसाचा समारोप मेवाती घराण्याचे ज्येष्ठ गायक संगीतमार्तंड पं. जसराज यांच्या गायनाने होईल.

शनिवार दि. १४ डिसेंबर रोजी ओंकारनाथ हवालदार यांच्या गायनाने शनिवारच्या महोत्सवाला सुरुवात होईल. ओंकारनाथ हवालदार हे पं. नागराज हवालदार यांचे सुपुत्र आहेत. यानंतर तेजस उपाध्ये आणि शाकीर खान यांचे व्हायोलिन व सतार सहवादन होईल. तेजस उपाध्ये हे व्हायोलिन वादक पं. अतुलकुमार उपाध्ये यांचे सुपुत्र आहेत तर शाकीर खान हे उस्ताद शाहीद परवेज यांचे पुत्र आहेत. त्यानंतर रामकृष्ण मठाचे संन्यासी असलेल्या स्वामी कृपाकरानंद यांचे गायन होईल. वाराणसीस्थित स्वामी कृपाकरानंद हे पं. जगदीश प्रसाद यांचे शिष्य आहेत. यानंतर ओडिसी नृत्यांगना रीला होता यांचे ओडिसी नृत्य होईल. त्यानंतर जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे – देशपांडे यांचे गायन होईल. तर जागतिक कीर्तीचे व्हायोलिनवादक डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन वादनाने शनिवारच्या दिवसाचा समारोप होईल.

रविवार दि. १५ डिसेंबर रोजी महोत्सवाच्या पाचव्या दिवसाची सुरुवात ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका वीणा सहस्रबुद्धे यांचे शिष्य अतुल खांडेकर यांच्या गायनाने होईल. त्यांच्या नंतर पं. उल्हास कशाळकर यांच्या शिष्या रुचिरा केदार यांचे गायन होईल. त्यानंतर पं. फिरोज दस्तूर यांचे शिष्य चंद्रशेखर वझे हे आपली गायनकला सादर करतील. यानंतर प्रसिद्ध सतारवादक नीलाद्रीकुमार यांचे सतारवादन होईल. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य पं. उपेंद्र भट हे यानंतर आपली गायनकला सादर करतील. पतियाळा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती यांचे गायन यानंतर होईल. तर ६७ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा समारोप परंपरेप्रमाणे किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने होईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments