१० ऑक्टोबर २०२०,
खेडचे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश नामदेव गोरे यांचे (वय- ५६) करोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्यावर काही दिवसांपासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेस मृत्यूशी त्यांची सुरू असलेली झुंज आज सकाळी अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, आई असा परिवार आहे.
माजी आमदार सुरेश गोरे यांना १७ सप्टेंबर रोजी करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू झाले, मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील नामांकित रुग्णालयात २२ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज(शनिवार) त्यांचा सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.
गोरे यांना २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खेडची उमेदवारी दिली होती. मात्र, काही कारणामुळे ती रद्द करण्यात आली. त्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. २०१४ ते २०१९ दरम्यान त्यांनी खेड आळंदी मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्वही केले आहे.