११ नोव्हेंबर
भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी नकार दिल्यानंतर , महाराष्ट्रातील घडामोडींला वेग आला असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यासह सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयन्त करणार, याची तयारी म्हणून शिवसेना महायुतीमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे .
लोकसभेपूर्वी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार मुख्यमंत्रीपदासह सत्तेच समसमान वाटप व्हावं, या मागणीवर ठाम राहिलेल्या शिवसेनेनं अखेर एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याच पहिल पाऊल म्हणजे मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असलेले शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. सावंत यांनी ट्विट करून आपण राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे.
“लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना (भाजपा आणि शिवसेना) तो मान्य होता. आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. या संदर्भात आज सकाळी ११.०० वाजता दिल्ली येथे मी पत्रकार परिषद (Press Conference) घेणार आहे,” असं सावंत यांनी ट्विट करून सांगितल आहे.