७ ऑक्टोबर २०२०,
उपाहारगृहांना आणि मद्यालयांना नियमांच्या अधीन राहून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी शासनाच्या नियमांचे पालन होते आहे किंवा कसे?, याबाबत बुधवारपासून (७ ऑक्टोबर) तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून तपासणी पथक स्थापन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. तसेच तीन वेळा नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.
करोनाच्या सद्य:स्थितीबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘उपाहारगृहे सुरू करण्यात आली असून सुरक्षित वावर आणि ग्राहकांची सुरक्षा याबाबत चालकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. नियमांची अंमलबजावणी होते किं वा कसे?, याबाबत तपासणी पथकांकडून पाहणी के ली जाईल. पथकामध्ये उपाहारगृहे, मद्यालय असोसिएशनचे प्रतिनिधी, महापालिका, राज्य उत्पादन शुल्क, पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी यांचा समावेश आहे. पथकाकडून उपाहारगृहांत जाऊन पाहणी करण्यात येणार आहे. पाहणीत नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास चालकांना ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड, तर तीन वेळा नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.’
गणेशोत्सवापूर्वी बाधितांची संख्या कमी झाली होती. उत्सवानंतर १८ ते २२ दिवस रुग्ण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. हीच परिस्थिती उपाहारगृहे आणि मद्यालये सुरू के ल्यानंतर उद्भवू शकते, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. पुणेकरांचे आरोग्य महत्त्वाचे असल्याने उपाहारगृह चालकांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र दारूबंदी कायदा, महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई के ली जाणार आहे, असेही राव यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी बंधनकारक
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील उपाहारगृह आणि मद्यालय चालक संघटनांची बैठक मंगळवारी विभागीय आयुक्त, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्तालयात पार पडली. उपाहारगृहांमधील प्रत्येक कर्मचाऱ्याची नियमित वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे, उपाहारगृहांमध्ये सॅनिटायझर, सुरक्षित वावर, खेळती हवा राहील, याबाबत बैठकीत सूचना करण्यात आल्या आहेत, असेही राव यांनी सांगितले.