२२ नोव्हेंबर
साहित्य निर्मिती ही अनुभवातून होत असते आणि ज्येष्ठांकडे अनुभवाची खाण असते. अनुभव हा जेंव्हा विवेकाच्या माध्यमातून अनुभूती पर्यंत पोहोचतो तेंव्हा तो कलेच्या पातळीवर विराजमान होतो आणि त्यातून निर्माण झालेली साहित्य कृती ही यशस्वी ठरते आणि ज्येष्ठांची प्रतिभा अनुभवाच्या पलीकडे असलेली अनुभूती मांडणारी असल्याने त्यातून निर्माण झालेली वास्तव साहित्यकृती समाजाला मार्गदर्शक ठरते असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष प्रा. राजन लाखे यांनी जेष्ठांच्या पहिल्या साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष पदावरुन बोलताना केले.
प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेले पाहिले ज्येष्ठांचे साहित्य संमेलन निगडी येथील सावरकर सदन येथे उत्साहात संपन्न झाले. सकाळी ७ वाजता साहित्य पालखीतील संत ग्रंथांचे पुजन करून निघालेल्या ग्रंथ दिंडीत ज्येष्ठांचा उत्साह तरुणांना लाजवणारा होता.
साहित्य व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष राजन लाखे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष जोशी, उपाध्यक्ष हिरालाल संकलेच्या, श्यामसुंदर परदेशी, किसन महाराज चौधरी, लालचंद मुथीयान, उपस्थित होते. लाखे पुढे म्हणाले की साहित्य संस्कृती आणि भाषा हे जीवनाचे अविभाज्य अंग आहेत. दैनंदिन जीवनात साहित्य हे कसे उपयोगी ठरते याचे मार्मिक विवेचन त्यांनी अध्यक्षपदाच्या भाषणातून केले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघातील कवी , लेखक वसुंधरा हुईलगोळकर, हेमलता डीग्गीकर, गुणवंत चिखलीकर, अर्चना वरटीकर, बाळकृष्ण हिंगे , डॉ समिता टिल्लू, माधुरी मंगरुळकर, डॉ रजनी शेठ, मंगला मस्तूद, मीना उपासनी, मालती केसकर, मंगला ताम्हणकर, रमाकांत श्रीखंडे, तर संपादक ज्योती इंगोले, रोहिणी आडकर, श्यामसुंदर परदेशी, जगन्नाथ वैद्य आदींचा राजन लाखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेतर्फे निगडी येथील मूकबधिर विद्यालयास रुपये ५००० ची देणगी देण्यात आली.कविसंमेलनात ३६, कथाकथात १६ तर नाट्यछटा व नाट्यवाचनात १७ ज्येष्ठांनी सहभाग नोंदवला.परीक्षक म्हणून सौ इला पवार व डी बी जोशी यांनी काम पाहिले. विजेत्यांचा स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला. सुभाष जोशी यांनी प्रास्ताविक केले तर बाळकृष्ण हिंगे व समिता टिल्लू यांनी सूत्रसंचालन केले