११ मार्च २०२०,
भारतातील तीनशे पन्नास जिल्हे व बारा राज्य पाण्यासाठी संघर्ष करीत आहेत. आठ हजार गावात पाणी पातळी अतिशोषित झाली आहे. विकासाच्या नावाखाली माती आणि पाण्याचे अवमुल्यन झाले आहे. यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर वन संरक्षण, पाणी संवर्धन, मृद संधारण आणि पर्यावरण रक्षण ही जागतिक चळवळ झाली पाहिजे, तरच मानवी जीवन सुरक्षित राहिल. असे प्रतिपादन राज्य सरकारच्या आदर्श ग्राम उपक्रमाचे कार्यकारी संचालक हिवरे गावचे सरपंच पोपटराव पवार यांनी केले.
पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा प्रथमच पिंपरी चिंचवडमध्ये अडोर वेल्डिंग लि. सीएसआर कमिटीच्या वतीने सोमवारी (दि. 9 मार्च) जाहिर सत्कार करण्यात आला. यावेळी अडोर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सतिश भट, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरिष प्रभूणे, प्रिती वैद्य, विनायक भिडे, अनिरुध्द बेलेकर, बाबूराव ठाणगे आदी उपस्थित होते.
पोपटराव पवार म्हणाले की, जगाला मानवाच्या कल्याणाचा मार्ग दाखविणारी भारत ही कर्मभूमी आहे. वड, पिंपळ, उंबर, रामफळ, आंबा अशी दिर्घायुष्याची झाडे लावा असे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. आपल्या संस्कृतीत या झाडांना देवत्व दिले आहे. त्याच्या मागचा उद्देशच पर्यावरण आणि पाणी रक्षण हा आहे. जगाला भारताने योगा आयुर्वेदासह निसर्गाधारित जगण्याचे मार्गदर्शन दिले. मानवी कल्याणासाठी केलेली व्यवस्था म्हणजे आपली भारतीय संस्कृती होय. परंतू आताची पिढी पाश्चिमात्यांचे अनुकरण करण्यात धन्यता मानत आहे. महात्मा गांधींनी स्वातंत्र्या नंतरचा भारत म्हणजे, ‘ग्राम स्वराज्य योजना’ असे सांगितले होते. खरं ‘स्वराज्य’ ग्राम योजनेतूनच मिळेल. दुर्दैवाने तसे झाले नाही, शहरात इंडिया झाला आणि गावात भारत राहिला. इंडिया विरुध्द भारत यामुळे ‘इंडो भारत’ तयार झाला. यातून विकासाऐवजी अखिल मानवी जीवनच धोक्यात आणणा-या समस्या निर्माण झाल्या. सगळी धरण शेती समोर ठेवून बांधली. परंतू त्याचा लाभ शेतीला मिळाला नाही. औदयोगिक शहरी प्रदूषणामुळे नद्यांची ऑक्सीजनची पातळी खाली गेली आहे. जगात शंभरांहून जास्त देश पाण्यासाठी संघर्ष करीत आहेत. पंजाब, हरियाना प्रदेशाने देशाची भूक भागवली. परंतू आता त्या राज्यातील प्रत्येक कुटूंबात एक व्यक्ती कॅन्सर किंवा नशेत अडकले आहेत. अती फर्टिलायझर मुळे मातीची क्षमता संपुष्टात आली आहे. येथून पुढे सर्वात मोठा उद्योग आरोग्य हा असेल, कारण आपले आहार शास्त्र बिगडले आहे. तापमान वाढीमुळे पर्यावरणच नव्हे तर मानवी जीवनच धोक्यात येत आहे. तंत्रज्ञानाने रोबोट निर्माण होतील परंतू वृक्ष लागवड मानसांणाच करावी लागेल. मानवच पर्यावरण रक्षण करु शकतो. हे पुढच्या पिढीला सांगण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत निसर्गाशी एकरुप होऊन कसे जगावे हे शिकवले पाहिजे असेही पोपटराव पवार म्हणाले.
अडोर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सतिश भट अध्यक्षीय भाषण करताना म्हणाले की, भारतीय भूमी त्याग करणा-या महान व्यक्तींची भूमी आहे. याच प्रेरणेतून अडोर वेल्डिंग कंपनी सीएसआर कायदा येण्याच्या अगोदर पासूनच, व्यवसायवृध्दी करणे जसे व्यवस्थापनाचे काम आहे. तसेच जेथून आपण काही कमावतो त्या कर्मभूमीला परत काही देणे हे आपले कर्तव्य आहे. याच भावनेतून त्याग प्रवृत्तीने कंपनी अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे. त्यातून गरीब विद्यार्थ्यांना मोफत चार महिन्यांचे निवासी तांत्रिक मार्गदर्शनाचे वर्ग घेतले जातात. यातून विद्यार्थ्यांचे व्यवसाय कौशल्य वाढते. आतापर्यंत एक हजार पेक्षा जास्त कुटूंबांना प्रत्यक्ष उत्पन्न वाढीसाठी मदत झाली आहे. ‘हिवरे बाजार’ या गावाचा कायापालट करण्यात आणि जागतिक ब्रॅण्ड बनविण्यात पोपटराव पवारांचे मोठे योगदान आहे असेही सतिश भट यांनी सांगितले.
सुत्रसंचालन संतोष झांबरे, आभार विनायक भिडे यांनी मानले.