६ फेब्रुवारी २०२०
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधान बोलत होते. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधान बोलत असताना काँग्रेस वर टीकांचा मारा केला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी हे तुमच्यासाठी ट्रेलर असतील, मात्र आमच्यासाठी ते जीवन आहेत’, तसेच “लोकांनी केवळ सरकार बदलली नाही, तर देशात बदल होण्याचीही अपेक्षा ठेवली. नव्या विचारानं काम करण्याची देशाची इच्छा आणि अपेक्षा आहे. आम्हीही तुमच्याच रस्त्यानं चालत राहिलो असतो, तर ७० वर्षानंतरही ३७० कलम हटवलं गेलं नसतं. तुमच्याप्रमाणेच काम केलं असतं, तर मुस्लीम महिलांना आजही तिहेरी तलाकची भिती असती. राम जन्मभूमीवरून आजही वाद सुरूच असता. कतारपूर साहिब कॉरिडॉरही झाला नसता. तुमच्याच मार्गानं चालत राहिलो असतो, तर भारत-बांगलादेश वाद कधीच सुटला नसता,” असं सांगत मोदी यांनी काँग्रेसला धारेवर धरले.
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह इतर विरोघी पक्षांनाही चिमटे काढले. तुम्ही राजकारण करा, केलेही पाहिजे, मात्र देशातील शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नका असे पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना निक्षून सांगितले. आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या आणि या योजनांचा देशातील शेतकऱ्यांना फायदा झाला असेही नरेंद्र मोदी म्हणाले. का झाले नाही, कधी होणार, कसे होणार, असे सगळे प्रश्न विचारले गेल्यामुळे मला जराही वाईट वाटत नाही. मला वाटते की केवळ मोदीच काय ते करू शकतो हे तुम्ही आता मानू लागला आहात, असेही मोदी म्हणाले.
देशातील बेरोजगारी दूर करण्याचे काम देखील आम्हीच करणार आहोत. मात्र, एक काम आम्ही अजिबात करणार नाही आणि ते होऊही देणार नाही. ते आहे तुमची बेरोजगारी दूर करण्याचे काम. तुमची बेरोजगारी आम्ही संपू देणार नाही, असा टोला मोदी यांनी भाषणादरम्यान लगावला.