४ फेब्रुवारी २०२०
आपण जेव्हा नागरिकशास्त्र शिकतो तेव्हा समाजात कसे वावरायचे याचे एकूण नियम शिकतो. त्याचप्रमाणे लैंगिक नागरिकशास्त्र या शब्दाचा विचार समाजात व्हायला हवा. याचमुळे समभावावर आधारीत एक मजबूत समाज उभा रहाण्यास मदत होणार आहे, असे भाष्य नारी समता मंचच्या अध्यक्षा साधना दधीच यांनी केले.
त्या मास कम्युनिकेशन विभाग, महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी व मेन्स अंगेंस्ट व्हायलन्स ऍण्ड अब्युस (मावा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या समभाव चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात बोलत होत्या.
“स्त्री ही जन्मताच स्त्रिपण घेऊन येत नाही तर तिच्या जडणघडणीवेळी ते तिच्यावर इतरांकडून थोपवलं जातं. याच बेडीतून आता बाहेर पडण्याची वेळ आली आहे.” असेही त्या पुढे म्हणाल्या.
“स्री पुरुष लिंगभावाची पारंपरिक चौकट मोडून सर्व लिंगाशी निगडीत चित्रपटांचा समावेश समभाव चित्रपट महोत्सवात करण्यात आला आहे. देश विदेशातील सुंदर चित्रपटांचा यात समावेश आहे”, असे प्रतिपादन यावेळी मावा संस्थेचे संस्थापक हरीश सदानी यांनी केले.
स्त्री अत्याचाराला विरोध करणाऱ्या विषयाशी निगडीत विद्यार्थिनींचा थीम डान्स सादर करण्यात आला. तर प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य संजोग वाघेरे यांच्या हस्ते महात्मा फुले महाविद्यालयातील मास कम्युनिकेशन विभागाच्या नवनिर्वाचित लोगोचे अनावरण करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना बहुमुल्य मार्गदर्शन केले. यावेळी विभागाचे समन्वयक डॉ. माधव सरोदे, विभागप्रमुख प्रा. तुषार डुकरे, प्रा. शरद बोदगे व श्री. रुषीकेश खंबायत उपस्थित होते. हा महोत्सव ३ फेब्रुुवारी सुरु झाला असून ४ फेब्रुवारी रोजी याची सांगता होणार आहे. या महोत्सवाला सर्वांना प्रवेश खुला असून याच एकूण १४ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या महोत्सवात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या खरवास चित्रपटाचाही आस्वाद चित्रपटप्रेमींना घेता येणार आहे.