१६ नोव्हेंबर,
राफेल विमान खरेदी करार प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेले सर्व आरोप खोटे ठरले आहेत. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वच्छ प्रतिमा डागाळण्याचा काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने उधळून लावला आहे. या खोटारडेपणाबद्दल राहुल गांधी यांनी देशातील सर्व जनतेची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर माफी मागावी या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले.
भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गांधी यांनी देशातील जनतेची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश सदस्य उमा खापरे, शहर सरचिटणीस व प्रवक्ते अमोल थोरात, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष व नगरसेवक रवि लांडगे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, नामदेव ढाके, बाबासाहेब त्रिभुवन, शीतल शिंदे, बाबू नायर, नगरसेविका शर्मिला बाबर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, “गेल्या एप्रिल महिन्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची मोहीम सुरू केली होती. राफेल विमान खरेदी कराराच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना टार्गेट केले होते. त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागाळून काँग्रेसला सहानुभूती मिळविण्याचा गांधी यांचा प्रयत्न दिसत होता. त्याच काळात या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नरेंद्र मोदी सरकारला क्लिन चिट दिली होती. ही क्लिन चिट देताना सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या मताचा संदर्भ देऊन राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर पुन्हा आरोपांची राळ उडवली होती.
परंतु, देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत देऊन काँग्रेस आणि त्या पक्षाचे निष्क्रिय माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना चपराक लगावली. त्यांना पक्षाचे अध्यक्षपद सोडावे लागले, एवढा मोठा धक्का जनतेने काँग्रेसला दिला. त्यातून धडा घेण्याऐवजी काँग्रेसी लोकांनी राफेल विमान खरेदी कराराच्या चौकशीसाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने याचिका फेटाळली. एवढेच नाही तर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ देऊन आरोप केल्याने न्यायालयात माफीनामा सादर करण्याची राहुल गांधी यांच्यावर नामुष्की ओढवली.
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि राहुल गांधी यांचा माफीनामा म्हणजे नरेंद्र मोदी सरकारच्या पारदर्शक कारभारावरील शिक्कामोर्तब आहे. पंतप्रधान मोदी यांची स्वच्छ प्रतिमा डागाळण्याचा काँग्रेसी कट देशातील सर्वोच्च न्यायसंस्थेनेच उधळून लावला आहे. या खोटारडेपणाबद्दल देशातील जनता काँग्रेसला कधीही माफ करणार नाही. काँग्रेसने तसेच या पक्षाच्या निष्क्रिय माजी अध्यक्षाने देशातील जनतेची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी पवार यांनी यावेळी केली.”