१ ऑक्टोबर २०२०,
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली असल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. पोलिसांची गाडी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना घेऊन घटनास्थावरुन रवाना झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. काँग्रेसकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी योगी आदित्यनाथ यांना कशाची भीती वाटत आहे अशी विचारणा प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.
याआधी उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसमधील बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी जात असताना पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी चालत निघाले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं. पोलिसांनी लाठीचार्ज करुन आपल्याला खाली पाडलं असं राहुल गांधींनी सांगितलं.
पोलिसांनी मला धक्का मारून खाली पाडले- राहुल गांधी
मी हाथरसला जात असताना मला अडवताना पोलिसांनी मला धक्का देऊन खाली पाडले, त्यानंतर माझ्यावर लाठ्या चालवल्या आणि मला जमीनीवर पाडले, असे राहुल गांधी म्हणाले. या देशात काय फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच फिरू शकतात का, असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. आमची गाडी अडवली गेली, त्यामुळे आम्ही पायीच हाथरसला जात होतो, असे ते म्हणाले.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान हाथरस जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू आहेत. तर सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत.