महाराष्ट्रात निवडणूक आता अगदी तोंडावर येऊन ठेपलीये आणि म्हणूनच महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय चाललंय, त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी आम्ही निघालोय महाराष्ट्राच्या यात्रेवर, ‘महाराष्ट्र कुणाचा?’ हा प्रश्न घेऊन.
10 दिवसांत 10 जिल्हे पालथे घालण्याचा आमचा प्लॅन आहे आणि याचा श्रीगणेशा आम्ही सोमवारी केला नाशिकपासून…
आमचा दिवस सुरू झाला तो सलीम टी स्टॉल पासून. सकाळी-सकाळी गरमा गरम चहा पिऊन आम्ही लागलो पहिल्या फेसबुक लाईव्हच्या तयारीला. पहिला कार्यक्रम होता तो नाशिकच्या वरिष्ठ पत्रकारांसोबत. पण पत्रकारांशी गप्पा मारायच्या आणि चर्चा करायची म्हटल्यावर आपली पण तयारी आलीच…
सलीम टी स्टॉल म्हणजे नाशिकचा तरुणाईचा अड्डा. सकाळी 9 पासूनच या स्टॉलवर कॉलेजच्या मुला-मुलींची गर्दी. तसं पाहायला गेलं तर मॉर्निंग वॉक करून येणारेही काही कमी नव्हते.
आमच्या फेसबुक लाईव्हअगोदर अशाच काही कॉलेजच्या तरुणांशी गप्पा मारल्या. खरं तर मला जाणून घ्यायचं होतं की ते नाशिककडे, नाशिकच्या राजकारणाकडे आणि होऊ घातलेल्या निवडणुकांकडे ते कसं बघतात?


