Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीराज्यात कामगारांसाठी दवाखाने सुरु करणार : भारती चव्हाण

राज्यात कामगारांसाठी दवाखाने सुरु करणार : भारती चव्हाण

पुणे विभागात पहिला पायलट प्रोजेक्ट करण्याचा निर्णय गुणवंत कामगार परिषदेच्या अध्यक्षा भारती चव्हाण यांची माहिती

१०डिसेंबर ,
कामगार कल्याण मंडळाच्या वतीने राज्यभरातील कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी कामगार कल्याण मंडळाच्या केंद्रांवर दवाखाने सुरु करण्याचा निर्णय कामगार आयुक्तांच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती गुणवंत कामगार परिषदेच्या अध्यक्षा भारती चव्हाण यांनी दिली.

कामगार कल्याण निधी नियोजन आणि अंमलबजावणी करण्याबाबतची बैठक मंगळवारी (3 डिसेंबर) सहकारनगर पुणे येथील केंद्रावर कामगार कल्याण आयुक्त महेंद्र तायडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी गुणवंत कामगार परिषदेच्या अध्यक्षा भारती चव्हाण, कामगार कल्याण सहायक आयुक्त घन:श्याम कुळमेथे, अर्थ विभागाचे लेखा अधिकारी रविंद्र टोणपे, कायदा विभागाचे प्रशासन अधिकारी जितेंद्र पाटील, पुणे विभागाचे कामगार कल्याण अधिकारी समाधान भोसले, कामगार प्रतिनिधी राज अहिरराव, तानाजी एकोंडे, संजय गोळे, आण्णा जोगदंड हे कोअरकमिटी सदस्य उपस्थित होते.

राज्यातील पहिला दवाखाना पिंपरी चिंचवडमधील उद्यमनगर, संभाजीनगर आणि पुण्यातील सहकारनगर या कामगार केंद्रांवर लवकरच सुरु करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच कामगार व त्यांच्या कुटुंबियांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी मिळणाऱ्या रकमेत वाढ व्हावी. राज्यात कामगारांना आरोग्य सुविधा पुरविण्या संदर्भात स्थानिक केंद्रांवर दवाखाने सुरू करण्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला. याचा लाभ लाखो कामगार कुटुंबियांना होणार आहे.

सद्य परिस्थितीत कामगार कल्याण निधी कामगारांकडून 12%, मंडळाच्या वतीने 24% व शासनाच्या वतीने 36% अशा प्रमाणात जमा करण्यात येतो. तो सुधारीत करून कामगारांच्या वतीने 24%, मंडळाच्या वतीने 48% व शासनाच्या वतीने 72% करावा असा प्रस्ताव राज्य शासनास यापूर्वीच सादर करण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या प्रस्तावाची अंमलबजावणी झाल्यास कामगार कल्याण मंडळास दुप्पट निधी उपलब्ध होईल. या निधीमुळे कामगारांच्या व विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत दुप्पट वाढ करता येईल. शिष्यवृत्ती पाचवी पासून देण्याचे नियोजन आहे. याबाबतही प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच कामगारांना देण्यात येणा-या पुरस्कार रकमेत, दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी मिळणा-या रकमेत वाढ करता येईल.

पिंपरीतील आण्णासाहेब मगर स्टेडियमच्या बदल्यात पर्यायी जागा आणि निधी मिळण्याबाबत पाठपुरावा करणे व वेळ प्रसंगी कायदेशीर कार्यवाही करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. कामगार कल्याण भवन पुणे व पिंपरी चिंचवड येथे उपलब्ध असलेल्या सभागृह, हॉलचा विनियोग कामगार आपल्या उपक्रमांसाठी करू शकतात असे यावेळी ठरले. केंद्र पातळीवर सल्लागार समितीचे पुनर्गठन करण्याबाबतचा प्रस्ताव बोर्डापुढे मंजूरीसाठी ठेवण्यात येणार आहे सदर समिती मध्ये गुणवंत कामगारांचा सहभाग असावा. कामगार भुषण पुरस्कार एक ऐवजी चार करावेत आणि त्याची मुदत दहा वर्षे ऐवजी पाच वर्षे करावी या बाबतही चर्चा झाली. गुणवंत कामगार पुरस्कार ज्या दांपत्यांना मिळाले आहेत त्यांचा विशेष सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यात करण्यात येईल, असेही यावेळी ठरले. हा पुरस्कार वितरण सोहळा राज्यातील मंत्रीमंडळ स्थापन झाल्यावर त्वरीत घ्यावा. काही केंद्र बंद पडली आहेत; त्याचा पाठपुरावा करून सुरू करणे आणि जेथे नवीन केंद्र सुरू करण्याची आवश्यकता असेल तेथे त्वरीत कार्यवाही करण्याचे ठरले. तसेच तळेगाव दाभाडे येथे केंद्र सुरु करणे. कामगार साहित्य संम्मेलन, गुणवंत कामगार परिषद, कामगार दिंडी आणि कामगार मॅराथॉन स्पर्धा हे उपक्रम पुन्हा चालू करून. नियोजनामध्ये गुणवंत कामगार परिषदेने सक्रिय सहभाग घेऊन ते उपक्रम यशस्वी करावेत, या बाबत सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती भारती चव्हाण यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments