Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीमोरया गोसावी महोत्सव शनिवार पासून

मोरया गोसावी महोत्सव शनिवार पासून

अविनाश धर्माधिकारी, भाऊ तोरसेकर, माधव भांडारी यांचे होणार व्याख्यान
सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचा नाट्यसंगीत, अभंगवाणीचा कार्यक्रम
शांतीनाथ महाराज यांना ‘श्री मोरया जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर

पिंपरी, 4 डिसेंबर – श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव 7 ते 17 डिसेंबरच्या कालावधीत चिंचवड येथे साजरा होणार आहे. या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम, व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. समाधी सोहळ्याचे यंदाचे 458 वे वर्ष आहे. देवस्थानच्या वतीने देण्यात येणारा ‘श्री मोरया जीवन गौरव’ पुरस्कार यंदा शांतीनाथ महाराज यांना जाहीर झाला आहे.

याबाबतची माहिती ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विश्वस्त विश्राम देव, आनंद तांबे, विनोद पवार, नगरसेविका अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, करुणा चिंचवडे, नगरसेवक सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते.

महोत्सवाचे उद्‍‍घाटन शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते 7 डिसेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, अशोक पवार, उपमहापौर तुषार हिंगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पंढरीनाथ पठारे, रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. नारायण पचुंदकर, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अॅड. विकास ढगे-पाटील उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवानिमित्त 7 ते 13 डिसेंबरच्या कालावधीत रोज सकाळी नऊ ते 11 या वेळेत श्री मोरया गोसावी चरित्रपठण होईल. तसेच सामुदायिक योगासनवर्ग, भजन, कीर्तन, शास्त्रीय आणि अभंग गायन, सुगम संगीत, प्रवचन, सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, श्री मोरया गोसावी चरित्र पठण, सामुदायिक महाभिषेक, रक्तदान शिबिर, पुरुषसुक्त मंडलजप आणि हवन, श्रीसूक्तपठण, दंत आणि नेत्र चिकित्सा शिबिर, माफक दरात चष्मे वाटप असे विविध कार्यक्रम महोत्सवा दरम्यान होणार आहेत.

7 ते 13 डिसेंबर दरम्यान दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे ‘मुद््गल पुराण’ या विषयावर प्रवचन होणार आहे.

8 डिसेंबर रोजी रात्री आठ ते दहा या वेळेत डॉ. राजश्री महाजनी यांचा ‘गोफ स्वरांचा’ हा गायन व वादनाचा कार्यक्रम होणार आहे.

9 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता श्रेयस बडवे व मानसी बडवे यांच्या नारदीय कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

10 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता बीडचे बाबासाहेब महाराज इंगळे यांचे कीर्तन होईल.

11 डिसेंबरला सायंकाळी आठ ते दहा या वेळेत तानसेन संगीत विद्यालयाचा सुगम संगीताचा कार्यक्रम होणार आहे.

12 डिसेंबरला सायंकाळी आठ वाजता पुण्याचे चंद्रकांत महाराज वांजळे यांचे कीर्तन होईल.

13 डिसेंबरला सकाळी सहा वाजता संस्कार भारतीचा साहित्य, नाट्य व नृत्यकलेचा कार्यक्रम होईल. सायंकाळी साडेसहा वाजता ‘सुवर्ण युगाच्या स्वप्नांसाठी’ या विषयावर माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन होईल. रात्री नऊ वाजता हर्षद अभिराज, राधा मंगेशकर, मनीषा निश्चल यांचे ‘नातं तुझं -माझं ‘ हा कार्यक्रम होईल.

14 डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता मोराया गोसावी समाधीची महापूजा चंद्रशेखर रबडे गुरुजी यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी सात वाजता शालेय विद्यार्थ्यांचे अथर्वशीर्ष पठण, साडेआठ वाजता श्रीमोरया गोसावी चरित्र पठण होईल. सायंकाळी साडेपाच वाजता ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे ‘विद्यमान सरकार समोरील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान होईल. रात्री साडेआठ वाजता मुग्धा वैशंपायन यांचा सुगम संगीत हा कार्यक्रम होणार आहे.

15 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे कीर्तन होणार आहे. रात्री साडेआठ वाजता सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचा नाट्यसंगीत व अभंगवाणीचा कार्यक्रम होईल.

16 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र पुनर्वसन प्राधिकरणाचे अध्यक्ष माधव भांडारी यांचे ‘धर्मनिरपेक्षता’ विषयावर व्याख्यान होईल. सायंकाळी सात वाजता ‘श्री मोरया जीवन गौरव पुरस्कार’ वितरण सोहळा होणार आहे.

यावेळी अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठ च-होलीचे कुलपती डॉ. अजिंक्य पाटील, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी मानद सचिव सतीश उरसळ, जेजुरीतील मार्तंड देवस्थानचे मुख्य विश्वस्त अॅड. अशोकराव संकपाळ, वडगावशेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. विजयराज दरेकर उपस्थित राहणार आहेत. रात्री नऊ वाजता पद्मश्री विजय घाटे यांचा मेलोडिक -ऱ्हिदम कार्यक्रम होईल.

17 डिसेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता श्रीमोरया गोसावी समाधीची मंदार देव महाराज यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. सकाळी सात वाजता दिंडी सोहळा आणि श्रीमोरया गोसावी समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी होणार आहे. सकाळी साडेआठ वाजता आसाराम महाराज बढे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. महाप्रसादानंतर महोत्सवाची सांगता होईल.

‘श्री मोरया जीवन गौरव’ पुरस्कार शांतीनाथ महाराज यांना जाहीर

चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षी ‘श्री मोरया जीवन गौरव’ पुरस्कार देण्यात येतो. यंदा शांतीनाथ महाराज यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. शांतीनाथ महाराज ज्ञानेश्वरी, भगवतगीतेचे अभ्यासक आहेत. त्यांनी नाथसंप्रदयाची दिक्षा घेतली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments