६ फेब्रुवारी २०२०
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत मोदींनी सरकारच्या कमांचा पाढा वाचतानच विरोधाकांवरही टिका केली. आपल्या भाषणात मोदींनी अनेक अशी वक्तव्य केली ज्यामुळे सभागृहात हशा पसरला. त्यांनी असेच एक वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दलही केलं.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या सुरु असून, काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची सभा झाली होती. या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी ‘तरुण-तरुणी सहा महिन्यांत काठ्यांनी मारतील’ असं म्हटलं होतं. राहुल गांधी यांच्या वक्तव्याला मोदी यांनी लोकसभेत उत्तर दिलं. राहुल यांचा थेट उल्लेख न करता, “काँग्रेसचा एक नेता म्हणाला की, सहा महिन्यांत तरुण मोदींना दांडक्यांनी मारणार. असं असलं तर मी सहा महिन्यात सूर्यनमस्कार करून स्वतः दांडकाप्रुफ करून घेईल,” अशी प्रतिक्रिया त्यांनी या वेळेस दिली. यानंतर सभागृहातील भाजपा आणि मित्रपक्षांचे खासदार हसू लागले.
“मला दांडक्यांनी मारणं हे काम थोड अवघड आहे. त्यासाठी सहा महिने तयारी करावी लागेल. त्यामुळे पुढील सहा महिन्यात सूर्यनमस्कारांची संख्या वाढवण्याचं मी सुद्धा असं ठरवलं आहे. गेल्या २० वर्षात असभ्य भाषा आणि शिव्यांनी स्वतःला गालीप्रुफ करून घेतलं आहे. आता सहा महिन्यात अशी मेहनत करणार की, माझ्या पाठीला प्रत्येक काठीचा वार सहन करण्याची ताकद मिळेल,” असा टोला मोदींनी दिला.
या वक्तव्यानंतर सभागृहामध्ये एकच हशा पिकला. राहुल गांधी काहीतरी बोलण्याची परवानगी मागत असतानाच मोदींनी पुन्हा एकदा त्यांचे नाव न घेता टोला लगावला. “गेल्या ३०-४० मिनिटांपासून मी बोलत आहे. पण तिथे करंट पोहचायला एवढा वेळ लागला. काही ट्यूबलाइट्स असतात अशा,” असं मोदी राहुल गांधी जागेवरुन उभे राहिल्यानंतर म्हणाले. मोदींच्या अनेक वक्त्यांवर सत्तेत असणारे खासदार खळखळून हसल्याचे पहायला मिळाले.