२८ नोव्हेंबर
भारतात महात्मा गांधीजीं जयंती साजरी करत असताना तिकडे मॅन्चेस्टर मध्ये महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त त्यांच्या ब्राँझमधील पुतळ्याचे अनावरण यूकेतील मॅन्चेस्टर कॅथेड्रल लगत नुकतेच करण्यात आले. गांधीजींचा हा पुतळा भारताबाहेरील उंच पुतळ्यांमध्ये एक ठरला आहे. श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूर या संस्थेतर्फे विश्वव्यापी आध्यात्मिक मोहिमेअंतर्गत हा पुतळा मॅन्चेस्टरमध्ये उभारण्यात आला आहे. याप्रसंगी मॅन्चेस्टरचे महापौर अन्डी बर्नहॅम, कौन्सिल नेते सर रिचर्ड लीझ, मॅन्चेस्टरचे बिशप राईट रेव्हरंड डॉ. डेव्हिड वॉकर, श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूरचे संस्थापक गुरूदेवश्री राकेशभाई तसेच भारत सरकारमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या अनावरण सोहळ्याला ब्रिटनच्या उच्चायुक्तातील प्रतिनिधी, भारतीय प्रतिनिधी तसेच धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते. श्रीमद् राजचंद्र हे महात्मा गांधी यांचे आध्यात्मिक गुरू होते. गांधीवाद म्हणून प्रसिद्ध झालेल्या तत्त्वांमध्ये श्रीमद् राजचंद्रांच्या सत्य, करुणा, अहिंसा या तत्त्वांचा प्रभाव पडल्याचे महात्मा गांधीजींनी नमूद केले आहे. अशा महान व्यक्तींचा जन्म आणि जीवन स्मरणात ठेवण्यासारखे असून यामुळे आपल्यातील सुप्त शक्ती जागृती होऊन आपण त्यांच्यासारखे जीवन जगण्यास प्रेरित होतो, असे राकेशभाई यांनी यावेळी सांगितले.
मॅन्चेस्टर शहरातील मध्यवर्ती चौकात स्थापन करण्यात आलेला गांधीजींचा हा पूर्णाकृती पुतळा राम सुतार यांनी घडवला आहे. नऊ फूट उंच आणि ८०० किलो वजनाचा हा पुतळा आहे. याचा खर्च कामानी कुटुंबीयांनी त्यांचे आजोबा भांजीखांजी कामानी यांच्या स्मरणार्थ केला. या प्रकल्पाला मॅन्चेस्टर कॅथेड्रल, मॅन्चेस्टर सिटी कौन्सिल, मॅन्चेस्टर इंडिया पार्टनरशिप आणि भारतीय उच्चायोग यांचे सहकार्य लाभले आहे.