२२ नोव्हेंबर
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं यावर सहमती झाली आहे. शरद पवार यांनी बैठकीच्या बाहेर आल्यानंतर ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव आम्ही पुढे केलं आहे. तिन्ही पक्षांनी यासाठी सहमती दर्शवली आहे. नेतृत्त्व कोणी करायचं हा आमच्या समोरचा अजेंडा नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच उद्या पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे असंही पवार यांनी स्पष्ट केलं.
मुंबईत नेहरु सेंटरमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक सुरु आहे. सरकार स्थापन करण्यासंबंधी या तिन्ही पक्षांमध्ये जवळपास एकमत झालं असून लवकरच ते सत्ता स्थापनेचा दावा करु शकतात. आधी शरद पवार या बैठकीतून बाहेर पडले. या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. “पहिल्यांदाच आमच्या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एकत्र चर्चा झाली. बऱ्याच गोष्टीवर आम्ही मार्ग काढला आहे. मला तुम्हाला आता अर्धवट माहिती द्यायची नाही. तुमच्यासमोर येऊ तेव्हा एकही मुद्दा अनुतरित्त ठेवणार नाही. सर्व प्रश्न सोडवून तुमच्यासमोर येऊ. आमची चर्चा योग्य दिशेने सुरु आहे” असे उद्धव ठाकरे म्हणाले.