१७ नोव्हेंबर – लेखक जावेदा जिंदगी
माणसाच्या जन्मासोबत त्याला काही नाती मिळतात.जन्मल्यानंतर तो काही नाती जोडतो. परंतू तरीसुद्धा आपली एकही नाती खरी नाहीत असा माझा समज आहे.आपली आजची नाती म्हणजे एकमेकांच्या वापरण्याची, हवं तसं,हवं तेव्हा ओरबाडण्याची गोष्ट झालीयं. आणि तरीसुद्धा माणूस आपल्या नात्यांमधे खुप सारं प्रेम आहे असंही दाखवत राहतो.एक माणूस दुसऱ्या माणसाला माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे असं म्हणतो. तर ते नात्यातलं प्रेमही मरेपर्यंत त्याला टिकवून ठेवता येत नाही. जन्मापासून मरेपर्यंत माणूस कुठल्याही एका नात्यात सुखी,शांत जगला असं होत नाही. त्यातही पुन्हा कितीतरी रुसवे, फुगवे आणि कधी कधी स्वार्थीपणा असतोचयं. प्रसंगी नात्यातली माणसंच एकमेकांना गरजेच्यावेळी नडायला पाहतात.
किंबहूना मला आजच्या माणसा – माणसातलं प्रेमही खरं वाटत नाही. प्रत्येक माणूस आपली नाती हवी तशी वापरायला, वाकवायला पाहतो. समोरचा माणूस आपल्या मनासारखा वागला तर आपण त्याला प्रेम,खरं नातं म्हणतो.मनासारखा नाही वागला की, मग नाराज्या सुरू होतात. त्यातून नाती खरी बिनसत जातात. नात्यानात्यात तेढ निर्माण होतात. शेवटी अशी नाती एकमेकांपासुन तुटत जातात. तोंडदेखली किंवा समाजाला दाखवण्यापुरती राहुन जातात. खरंतर नाती कधीच बिनसणार नाहीत. किंवा आपण जिते आहोत तोवर नात्यातला निर्मळ, नैतिक, पारदर्शीपणा,मायेचा ओलावा टिकुन राहील यावर काही उपाय असु शकतो काय, तर असु शकतो.एका माणसानं दुसऱ्या माणसाला त्याच्या मनासारखं जगू देणं.त्याच्या जगण्यात आडवं न येणं. आपल्या नात्यातल्या माणसावर मालकी हक्क न दाखवणं. आणि मुख्य म्हणजे समोरच्या माणसाला माणूस समजणं. त्याला माणूस म्हणून वागणूक देणं. आणि हे कुणी करायचं तर आपण स्वतःचं. आपल्या पासुनच आधी सुरुवात करणं. समोरचा माणूस आपल्याशी काय वागतो, यापेक्षा आपण त्याच्याशी काय वागतो हे मला महत्वाचं वाटतं. ही वाट खडतर आहे हे मी जाणतो. पण पुढची पिढी आपल्याकडे लक्ष ठेवून असते. आपण आपल्या नात्यातल्या माणसांशी काय वागतो हे ती पाहत असते. तसंच अनुकरणही ती करायला शिकते. म्हणून आपण स्वतः आधी बदलायला हवं असं मला वाटतं. जेणेकरून येत्याकाळात आपली नाती निर्मळ, नेक, पारदर्शी निश्चितच होतील. माणूस नात्यांना अर्थ येईल.
विशेष:- लेखक जावेदा जिंदगी, लेखक मुक्त पत्रकार, व्याख्याते असुन, अक्षर मानव संघटनेचे राज्य संघटक आणि माणूस व्हा मोहिमेचे राज्य प्रमुख आहेत.