३ फेब्रुवारी २०२०
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घुसखोर पाकिस्तानी व बांगलादेशींना देशातून हकलवून लावण्याच्या मागणीसाठी ९ फेब्रुवारीला मोर्चा आयोजित केला आहे. मनसेच्या या नियोजित मोर्चाच्या प्रस्तावित मार्गाला नकार देत पोलिसांनी मनसेला धक्का दिला. भायखळा ते आझाद मैदान या मार्गावरून मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारताना मनसेच्या मोर्चाला मरिन ड्राइव्ह ते आझाद मैदान या मार्गावरून मोर्चा नेण्याची परवानगी दिली आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चाचा मार्ग नाकारला आहे. हा मार्ग नाकारताना पोलिसांनी मनसेला पर्यायी मार्ग देखील सुचवला आहे. पोलिसांची ही सूचना मनसेने मान्य केली असून मनसेचा ९ फेब्रुवारीचा हा मोर्चा मरिन ड्राइव्ह ते आझाद मैदान असा निघणार आहे. मनसेकडून या नव्या मार्गाचे पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आले आहे.
घुसखोरांविरूद्धचा उपस्थित केल्यानंतर मनसेचा सीएए आणि एनआरसीला पाठिंबा असल्याची चर्चा सुरू झाली होती. मनसेच्या भूमिकेवर अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. मात्र, नंतर स्वतः पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच यावर खुलासा केला. बेकायदा पाकिस्तानी, बांगलादेशी मुसलमानांना हाकला, असं आपण म्हणालो होतो. सीएएचं समर्थन केलं नाही. आपल्या वक्तव्याचा प्रसार माध्यमांकडून चुकीचा अर्थ लावण्यात आला,” असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं.