१७ मार्च २०२०,
देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातला असताना महाराष्ट्रात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोनाग्रस्त रुग्णाचं निधन झालं आहे. यामुळे भारतातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. करोनाची लागण झालेल्या ६४ वर्षीय व्यक्तीवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. पण आज सकाळी त्यांचं निधन झालं. ही व्यकी घाटकोपरला वास्तव्यास होती. कोरोनाची लागण झाली असल्याने त्यांना कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. मंगळवारी सकाळी त्यांचं निधन झालं.
भारतात कोरोनामुळे आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या मृत्यूची नोंद कर्नाटकात झाली होती. कर्नाटकमध्ये ७९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राजधानी दिल्लीत दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यात दिल्लीमधील राम मनोहर लोहिया रुग्णालयात ६८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे.
देशात कोरोनाची लागण झालेल्या सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. केरळ, ओडिशा, उत्तर प्रदेशमध्ये नवे रुग्ण सापडल्याने भारतातील एकूण करोना रुग्णांची संख्या १२७ वर पोहोचली आहे.