३१ जानेवारी २०२०
नागरिकांना त्यांच्या मनासारख्या सुखसोई मिळाव्यात आणि अर्थसंकल्पात त्यांचा सहभाग असावा, यासाठी पालिकेने शहरातील नागरिकांना दहा लाख रुपयांपर्यंतची कामे सुचविण्याचे सहा महिन्यांपूर्वी आवाहन केले होते. त्याची मुदत संपली असून, अर्थसंकल्प तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पंधरा दिवसांत तो स्थायीसमोर मांडला जाणार आहे.
सरत्या आर्थिक वर्षात झालेली कामे, खर्च झालेला निधी आणि आगामी आर्थिक वर्षात करायची कामे, त्यासाठी लागणारा निधी, याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी सर्व विभागप्रमुखांसोबत आढावा बैठक घेतली. त्यात शहराच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा करणे, प्रलंबित पवना जलवाहिनीचे काम, पाण्याच्या नवीन स्रोतासाठी भामा-आसखेड व आंद्रा धरण पाणी योजना, केंद्र सरकारच्या ‘अमृत’ व ‘चोवीस बाय सात’ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेली जलवाहिन्यांची कामे, पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राबविणे, स्मार्ट सिटीबरोबरच अन्य भागांत अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट योजना राबविणे, बीआरटी प्रकल्प, समाविष्ट गावांमध्ये रस्ते आदींसह स्थापत्यविषयक प्रकल्प व त्यासाठी लागणारा निधी, यावर चर्चा झाली.
कामे व निधी यांचा मेळ घालण्यासाठी सर्व विभागांनी उत्पन्नवाढीवर भर देण्याचा आदेश हर्डीकर यांनी दिला आहे. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आलेली माहिती संबंधित विभागांकडे जाईल. त्यांची चौकशी होऊन कामांचा समावेश केला जाईल व ती माहिती स्थापत्यकडून लेखा विभागाकडे येईल. येत्या आठ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होऊन कामांचा समावेश अर्थसंकल्पात केला जाईल.