१४ मार्च २०२०,
कोरोना व्हायरसचा दुसरा बळी राजधानी दिल्लीत नोंदला गेला. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिल्ली सरकार आणि आरोग्य मंत्रालयाच्या दाखल्याने दिलेल्या बातमीनुसार पश्चिम दिल्लीत 68 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्याची संख्या २ झाली आहे.
दिल्लीतील आरएमएमल हॉस्पिटल अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कोव्हिड19 विषाणूचा संसर्ग तसंच अन्य आजारांमुळे या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला डायबेटिस तसंच हायपरटेन्शन हे आजार होते.
या महिलेचा मुलगा 5 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत परदेशात होता. 23 फेब्रुवारी तो स्वित्झर्लंड आणि इटलीहून भारतात परतला. परतल्यानंतर एक दिवस मुलाची तब्येत व्यवस्थित होती. दुसऱ्या दिवशी त्यांना ताप आणि खोकल्याची लक्षणं दिसू लागली. 7 मार्चला त्याला राम मनोहर लोहिया हॉस्पिटलात भरती करण्यात आलं.नियमांनुसार, त्यांच्या घरातील सगळ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. 8 मार्चला त्यांच्या आईची कोरोना चाचणी झाली. टेस्टचे रिझल्ट पॉझिटिव्ह आले.
9 मार्चला या महिलेत न्यूमोनियाची लक्षणं दिसू लागली. त्यांना श्वास घेतानाही त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना आरएमएल हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं.13 मार्चला त्यांचा मृत्यू झाला.या महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी केली जाणार आहे. संबंधित व्यक्तींना स्वतंत्रपणे ठेवण्यात येईल.