पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार श्री.अण्णा दादू बनसोडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना म्हणाले की दसरा आणि नवरात्रातही लोकांना पाणी मिळालं नाही, इतके पिंपरी-चिंचवडचे वाईट हाल होत आहेत.लोकांना खूप स्वप्नं दाखवून यांना सत्ता मिळवता आली मात्र कृतीत काहीच उतरवता आलेलं नाही, आमच्या काळात ७ दिवस २४ तास पाणी या शहराला द्यायचो पण, हा भाजपा बोलघेवड्यांचा पक्ष आहे, अशी टीका आज आकुर्डी येथे बोलताना अजित पवारांनी भाजपवर केली.
पानाच्या टपरीवर पान विकणाऱ्या साध्या सहकारी कार्यकर्त्याला स्थायी समितीचा चेअरमन, विधानसभेत आमदार करण्याची किमया फक्त पुरोगामी विचारांची लोकंच करू शकतात. पिपरीकरांनी, अण्णा बनसोडेंची मागची ५ वर्षाची कारकीर्द सध्याच्या आमदारापेक्षा उजवी आहे, हे लक्षात घेतली पाहिजे.
पिंपरी-चिंचवड, भोसरी परिसरात भ्रष्टाचार बोकाळला आहे. कामं कशाही प्रकारे केली जात आहेत. विकासकामांऐवजी हप्तेवसुली करणाऱ्या गुंडांप्रमाणे शहराचे दोन भाग करून, दोन्ही हातांनी ओरबाडून स्वतःकडे आवक कशी वाढेल, हे पाहिलं जातंय. या सगळ्यात मीडियाचाही वेगळ्याप्रकारे वापर केला जात आहे. हल्ली सामान्य लोकांनी सभेत शास्ती कर, रिंग रोडबाबत यांच्या मंत्र्यांना प्रश्न विचारले, तर त्यांच्याविरोधात हे लोक सत्तेचा गैरवापर करतात . या शहरात सर्व जाती-धर्माची लोकं नोकरीच्या निमित्तानं वास्तव्याला आल्यामुळे पिंपरी-चिंचवडची ‘मिनी भारत’ अशी ओळख होती. पण आज, किती small scale industries बंद पडल्यात ? वाहनक्षेत्राची, IT कंपन्यांची काय अवस्था आहे ? ५ लाख कोटींचं कर्ज राज्यावर का झालं? याचं उत्तर एकाही सभेत भाजपावाले देत नाहीयेत. गेल्या ५ वर्षांत १० रुपयांत जेवण देण्यापासून यांना कुणी रोखलं होतं ? केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घ्यायचे, असलं आम्ही कधी केलं नव्हतं.
आत्ताच्या सरकारनं ५ वर्षांत काय कामं केली आणि नंतर काय करणार ? यावर जनतेसमोर जायला हवं होतं. पण, केवळ विनाकारण पवार साहेबांवर टीका करत आहेत. मध्यंतरी, पिंपरी-चिंचवडकरांनी ‘नो वॉटर, नो व्होट’ अशी भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर घेतली होती. हे सरकार पोटावर लाथ मारणारं सरकार आहे.आम्ही मात्र जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे, कारखानदारीला पूर्वीचे चांगले दिवस आणणार. उद्योगपतींना गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करणार. ७५% स्थानिकांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, असा कायदा करणार शासकीय किंवा निमशासकीय रिक्त जागा ६ महिन्यांत भरणार असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.