२० नोव्हेंबर
भारतातील सरकारी टेलिफोन कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) मध्ये केंद्र सरकारने लागू केलेल्या स्वेच्छानिवृत्ती योजनेला कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या ७७ हजारांवर पोहोचली आहे. पात्र कर्मचाऱ्यांना या योजनेत ३ डिसेंबरपर्यंत सहभागी होता येईल. बीएसएनएलमध्ये एकूण दीड लाख कर्मचारी असून यातील एक लाख कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी पात्र आहेत. यातील किमान ७७ हजार कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी कंपनीचे अधिकारी प्रयत्नशील होते. त्यामुळे हे उद्दिष्ट जवळपास पूर्ण झाल्याचे दिसत आहे.
ज्यांनी वयाची ५० वर्षे पूर्ण केलेले व सेवेत कायमस्वरूपी असणारे कर्मचारी या योजनेस पात्र असतील. तसेच, मुळात बीएसएनएलचे असणारे परंतु पदोन्नती वा प्रतिनियुक्ती करण्यात आलेल्या व वरील अटीत बसणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही स्वेच्छानिवृत्ती योजनेत सहभागी होता येईल. ७० ते ८० हजार कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यास बीएसएनएलच्या मासिक पगार देयकात ७ हजार कोटी रुपयांची बचत होईल.
स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंतच्या एकूण सेवेतील प्रति वर्षासाठी ३५ दिवसांचा पगार तसेच, निवृत्तीस बाकी असणाऱ्या वर्षांसाठी प्रतिवर्ष २५ दिवसांचा पगार असा भरघोस परतावा देण्यात येणार आहे.