११ डिसेंबर
हैद्राबाद येथील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गेल्या पाच वर्षातील विनयभंग आणि बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींची यादी तयार करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णाई यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. आगामी काळात या आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील महिलांना सुरक्षा पुरवावी, अशी मागणी महापौरांसह विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पोलीस आयुक्तांनी शहरातील निर्जन स्थळांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश पोलिसांना दिले. तसेच निर्जन स्थळी दिवाबत्तीची सोय करण्यात यावी, असे पिंपरी चिंचवड महापालिकेला कळविण्यात येणार आहे.
प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘ छेडछाड विरोधी पथक ‘ तयार करण्यात आले असून त्यामध्ये एक महिला अधिकारी, दोन परूष व दोन महिला कर्मचारी घेण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षात विनयभंग आणि बलात्काराचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची यादी तयार करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. या आरोपींवर देखील आगामी काळात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची शक्यता आहे.